विश्वास तोच स्टाईल नवी; व्हिंटेज Luna नवीन इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:05 PM2024-02-07T20:05:27+5:302024-02-07T20:10:29+5:30

E Luna: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत EV Luna लॉन्च.

E-Luna: भारतात अनेक आयकॉनिक बाईक्स येऊन गेल्या, ज्या आजही बाईक लव्हर्सच्या मनावर अधिराज्य करतात. यामध्ये मोपेड लुना (Luna) चाही समावेश आहे. त्या काळी ज्यांच्याकडे लुना होती, त्यांना खुप श्रीमंत समजले जायचे आणि मान मिळायचा.

आता हीच Luna पुन्हा एकदा बाजारात दाखल झाली आहे. पण, यावेळी लुना वेगळ्या शैली अन् तंत्रज्ञानासह आली आहे. कंपनी Kinetic Green ने आज भारतात आपली इलेक्ट्रिक Luna लॉन्च केली.

तुम्ही शहरात चालवण्यासाठी एका चांगल्या इलेक्ट्रिक बाईकच्या शोधात असेल, तर लुना एक चांगला पर्याच ठरू शकतो. याची सर्वोच्च रेंज 110 किमी आहे, त्यामुळे शहरात तुम्ही आरामात फिरू शकता.

इलेक्ट्रिक लुना तीन व्हेरिएंटमध्ये येईल. 110 किमीची रेंज देणारे व्हेरियंट बाजारात येण्यासाठी तयार आहे. पण, कंपनी 150 किमीची टॉप रेंज देणाऱ्या व्हेरियंटवर काम करत आहे.

जेव्हा पेट्रोल लुना विकली जायची, तेव्हा पेट्रोल 40 रुपये प्रति लिटर होते. अशा स्थितीत प्रति किलोमीटर 40 पैसे इतका खर्च यायचा. आता इलेक्ट्रिक लुना फक्त 10 पैसे प्रति किलोमीटर दराने धावेल.

या नवीन ई-लुनामध्ये एक किलोमीटरचा खर्च फक्त 10 पैसे असेल. ही बाईक पूर्ण चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 रुपये खर्च करावे लागतील.

दररोज ऑफिसला जाणे आणि दैनंदिन कामासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे, फक्त पुरुषच नाही, तर महिलादेखील ही बाईक आरामात चालवू शकतात.

लॉन्चिंगदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील, 20 ते 25 हजार पगार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही ई-लुना वरदान ठरेल. आत्मनिर्भर भारतासाठी ई-लुना फायदेशीर ठरेल.

या ई-लुनाचे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले आहे. तुम्हाला ही ई-बाईक घ्यायची असेल तर तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता.