Car Care Tips: आला उन्हाळा, कार सांभाळा! अशी घ्या काळजी, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:31 AM2021-03-29T11:31:46+5:302021-03-29T11:39:08+5:30

Summer Car care tips in Heat: कारचे टायर, इंजिन ऑईल पासून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास ऐन प्रवासात तुमची कार ब्रेकडाऊन होऊ शकते, आणि तुम्ही भर उन्हात तासंतास कुठेतरी अडकू शकता. चला जाणून घेऊया कारची काळजी कशी घ्यावी...

होळीचा सण आला आहे, उकाड्य़ाचे दिवस सुरु झाले आहेत. या उष्णतेचा परिणाम कारवरदेखील होणार आहे. या उष्णतेच्या दिवसांत कारची खास काळजी घेण्याची आवश्यकता असते. (Summer Car care tips)

असे न केल्यास नुकसान होण्य़ाबरोबरच तुम्ही स्वत:लाही संकटात टाकू शकता. कारचे टायर, इंजिन ऑईल पासून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास ऐन प्रवासात तुमची कार ब्रेकडाऊन होऊ शकते, आणि तुम्ही भर उन्हात तासंतास कुठेतरी अडकू शकता. चला जाणून घेऊया कारची काळजी कशी घ्यावी...

सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे इंजिन. या इंजिनची विशेष काळजी घ्यायची असते. इंजिन भर उकाड्यात थंड राहण्यासाठी कुलंट खूप मदत करते. जर इंजिन जास्त तापले तर ते बंद पडते. यामुळे कुलंट योग्य प्रमाणात आणि वापरायोग्य आहे की नाही ते तपासावे. गरज असल्य़ास बदलावे.

वारंवार कुलंट लेव्हल चेक करावी आणि कुलंटचा कलर तपासावा. कुलंटचा रंग हा थोडासा भगवा असा असतो. तो निळा, हिरवा झाल्यास ते कुलंट खराब झाल्याचे लक्षण असते. प्रत्येक कंपनीनुसार कुलंटचा रंग आणि त्याची एक्पायरी डेट वेगवेगळी असू शकते.

उष्णतेमुळे टायरमधील हवेचे प्रेशर वाढते. यामुळे कारचे टायर अधिकतर उन्हाळ्यात फुटतात आणि अपघात होतात. यामुळे या ऋतूमध्ये कारमधील हवा वेळोवेळी तपासावी. कारच्या मॅन्युअलमध्ये हवा किती असावी हे दिलेले असते.

उन्हाळ्यात डांबराचे किंवा सिमेंटचे रस्ते हे तापलेले असतात. यामुळे शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन गॅस वापरावा. नायट्रोजन हा हवेपेक्षा थंड असतो आणि कमी वेगाने लिक होतो. यामुळे जर तुम्हाला तुमच्या भागात उपलब्ध असल्यास नायट्रोजन भरावा.

कारच्या इंजिनमध्ये अनेक प्रकारचे बेल्ट वापरलेले असतात. उष्ण, थंड हवा, पाण्याचा रबर असल्याने परिणाम होतो. रबर असल्याने उन्हाळ्यात तो लूज होण्याची शक्यता असते. तसेच जुना बेल्ट असल्यास तो तुटण्याचीही शक्यता असते. वेळोवेळी हे रबर बेल्ट तपासावेत.

इंजिन ऑईल हे इंजिनामध्ये लुब्रिकेशनचे काम करते. उष्णतेमध्ये ऑईल त्याची मूळ चिपचिपीत अवस्था सोडू शकते. यामुळे कारच्या इंजिनला नुकसान होते. यामुळे वेळोवेळी इंजिन ऑईलची पातळी आणि घनता चेक करत रहावी.

कंपनी ज्या प्रकारचे इंजिन ऑईल सांगते त्याच प्रकारचे इंजिन ऑईल वापरावे. ऑईलची ग्रेड ठरलेली असते.

तळपत्या उन्हात कार उभी केल्यास कारचा रंग उडण्य़ाची शक्यता आहे. यामुळे कार वेळोवेळी चांगली स्वच्छ करावी, धुवावी. रबिंग वॅक्स किंवा पॉलिश केल्याने कारचा रंग बाहेरील वातावरणापासून वाचण्यास मदत होईल.