पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:00 IST2025-09-30T14:59:44+5:302025-09-30T15:00:43+5:30
गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं शेत पूराच्या पाण्याने वेढलेलं असल्याने घेतला टोकाचा निर्णय.

पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण
- विठ्ठल भिसे
पाथरी: संपूर्ण पीक पाण्यात गेलं...शासन पंचनामा सुद्धा करत नाही , आता कस जगावं? अशी हताश हाक देत वडी येथील शेतकरी हनुमंत प्रभाकर तालडे (३५) यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता पाण्यात गेलेल्या शेतीकडे मोर्चा वळवला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं त्यांचं शेत पूरपाण्याने वेढलेलं होतं. शेती पाण्याखाली गेली, उरलेलं आयुष्य जगायचं कसं, या नैराश्यात ते थेट पुराच्या पाण्यातील आखाड्याकडे गेले.
या क्षणाचं हृदयद्रावक चित्र गावकऱ्यांनी मोबाईलवर टिपलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेची माहिती सरपंच सिद्धू पाटील यांनी महसूल विभागाला दिली. त्यानंतर तीन तासांनी प्रशासन हललं आणि भारतीय सैन्याने बोटीच्या मदतीने हनुमंत यांना सुखरूप बाहेर काढलं.
अद्याप पंचनामाच नाही, मदत कुठे?
हनुमंत तालडे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे फक्त दोन एकर स्वतःची शेती असून पाच एकर शेत त्यांनी ठोक्याने घेतलं होतं. प्रति एकर २५ हजार रुपये देऊन तब्बल सव्वा लाख रुपये भरले होते. मात्र पूराने सारे स्वप्न, सारी मेहनत, सर्व आशा पाण्यात गेली. “नुकसान झालं तरी शासन काही करत नाही. अजून पंचनामा झाला नाही, मग नुकसान भरपाई मिळणार कशी?” अशी व्यथा त्यांनी सैन्याच्या जवानांसमोर मांडली.
जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी
घरात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील अशी पोटाची जबाबदारी आहे. शेत उद्ध्वस्त झालं, ठोक्याचे पैसे डोक्यावर आहेत, आणि पुढचा दिवस कसा उजाडणार याची चिंता. त्यामुळेच हनुमंत यांच्यासारखा तरुण शेतकरी नैराश्याच्या गर्तेत खेचला गेला.
शासनाचे डोळे कधी उघडणार?
पूर हळूहळू ओसरतोय, पण शेतकऱ्यांच्या मनातला पूर अजूनही ओसरणार नाही. हनुमंत तालडे यांचं आयुष्य वाचलं, पण त्यांची स्वप्नं वाहून गेली. प्रश्न फक्त एवढाच आहे की, अशा शेतकऱ्यांच्या जखमा शासन खरंच भरून काढणार का? की या जखमा कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात खोल ठसे उमटवत राहणार?