चोरट्यांनी पळविली दोन लाखाची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:53+5:302021-02-05T06:02:53+5:30

शहरातील वकील कॉलनी परिसरात असलेले सुपर शॉपी दुकान बंद करून दुकानातील रोख रक्कम १ लाख ९५ हजार ५०० रुपये ...

Two lakh bags snatched by thieves | चोरट्यांनी पळविली दोन लाखाची बॅग

चोरट्यांनी पळविली दोन लाखाची बॅग

शहरातील वकील कॉलनी परिसरात असलेले सुपर शॉपी दुकान बंद करून दुकानातील रोख रक्कम १ लाख ९५ हजार ५०० रुपये घेऊन कुणाल अनिल यानपल्लेवार (वय ३० रा. देवळे जिनिंग परिसर हे २ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजे दरम्यान दुचाकीवरून घराकडे निघाले. तेव्हा त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अंदाजे २५ वर्ष वयोगटातील तीन अज्ञात चोरट्यांपैकी एकाने सचिन हराळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर कुणाल यानपल्लेवार यांच्या कानशिलात थापड मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे ते दुचाकीवरून खाली पडले. तेंव्हा चोरट्यांनी रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्या हातातून हिसकावून घेत दुचाकीवरून पळून गेले. कुणाल यानपल्लेवार यांनी केलेल्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा होईपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी कुणाल अनिल यानपल्लेवार यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोउपनि विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मध्यवस्तीत असलेल्या बाजार पेठेतून व्यापाऱ्याजवळील रोख रकमेची बॅग पळविल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गासह शहर वासीयांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी शहरातुन बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर सपोनि विकास कोकाटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल घोगरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवून नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही.

उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घटनास्थळास भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दुचाकीवरून पळून जाणारे अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले.

Web Title: Two lakh bags snatched by thieves