कापूस भरण्यासाठी भर रस्त्यात वाहने लावल्याने होतेय वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:59 IST2018-04-30T17:59:54+5:302018-04-30T17:59:54+5:30
खाजगी व्यापाऱ्यांकडून आडतीमधून खरेदी केलेला कापूस भर रस्त्यात वाहने उभीकरून त्यात भरणा केला जात आहे. यामुळे सतत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

कापूस भरण्यासाठी भर रस्त्यात वाहने लावल्याने होतेय वाहतूक कोंडी
पाथरी (परभणी ) : खाजगी व्यापाऱ्यांकडून आडतीमधून खरेदी केलेला कापूस भर रस्त्यात वाहने उभीकरून त्यात भरणा केला जात आहे. यामुळे सतत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
कल्याण ते निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग 222 पाथरी शहरातून जातो, मागील वर्षभरापासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील पोखरणी फाटा ते सोनपेठ फाटा पर्यंत डांबरीकरण झाल्यानंतर दुभाजक बसविले जात आहेत, शहरातील मुख्य भाग या मुळे दोन भागात विभागाला गेला आहे. यासोबतच रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. यातच आता मोंढा परिसरातून खाजगी व्यापारी आडत व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून भरत आहेत. यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यातून रोजच छोटे मोठे वाद उद्भवत आहेत. तसेच भर रस्त्यात हे काम केले जात असल्याने येथे मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. यामुळे यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.