वडिलांना ड्रायव्हिंग शिकविणाऱ्याचा क्रूर चेहरा; मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्यास कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:26 IST2026-01-09T18:24:41+5:302026-01-09T18:26:39+5:30
पोक्सो अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वडिलांना ड्रायव्हिंग शिकविणाऱ्याचा क्रूर चेहरा; मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्यास कारावास
परभणी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश-१ एन. आर. नाईकवाडे यांनी गुरुवारी निकाल दिला. यामध्ये आरोपी शिवप्रसाद संभाजी भोसले (२२, रा. बाणेगाव, ता. पूर्णा) यास पोक्सो अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पीडितेच्या वडिलांनी ८ जून २०२० रोजी बोरी ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले. परंतु, नंतर मुलगी सापडल्यानंतर तिने जबाब दिला. ज्यात आरोपी शिवप्रसाद भोसले हा तिच्या घरी पीडितेच्या वडिलांना जीप शिकवण्यासाठी येत होता. यानंतर आरोपीने पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळवून घेऊन गेला. नंतर तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेस आपण लग्न करू, असे म्हणून हैदराबाद येथे मित्राच्या घरी नेले. परंतु, त्याच्या मित्राने आश्रय न देता पोलिसांना फोन करून ही माहिती दिली व आरोपीसह पीडितेस पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर बोरी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोक्सो अन्वये गुन्हा नोंद झाला.
पोलिस उपनिरीक्षक पंडित शिरसे यांनी तपास केला. तपासाअंती परभणी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन. आर. नाईकवाडे यांनी गुरुवारी निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनात सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी बाजू मांडली. आरोपी शिवप्रसाद भोसले यास गुरुवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, हरी किशन गायकवाड, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.