जिंतूर रस्त्यावरील सात अतिक्रमणे जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:21 AM2021-02-25T04:21:38+5:302021-02-25T04:21:38+5:30

परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावर मनपाच्या जागेवरील सात अतिक्रमणे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २४ फेब्रुवारी रोजी जमिनदोस्त केली आहेत. ...

Seven encroachments on Jintur Road | जिंतूर रस्त्यावरील सात अतिक्रमणे जमिनदोस्त

जिंतूर रस्त्यावरील सात अतिक्रमणे जमिनदोस्त

googlenewsNext

परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावर मनपाच्या जागेवरील सात अतिक्रमणे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २४ फेब्रुवारी रोजी जमिनदोस्त केली आहेत. पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या या मोहिमेत अतिक्रमण धारकांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान एकाने आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त देविदास पवार यांनी दिले आहेत. जिंतूर रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केल्याची तक्रार या भागातील एका नागरिकाने मनपाकडे केली होती. मागील अनेक दिवसांपासून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तक्रारकर्त्याने अतिक्रमण न हटविल्यास २४ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तत्काळ दखल घेत, बुधवारी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. यावेळी सहाय्यक आयुक्त महेश गायकवाड, संतोष वाघमारे, शहर अभियंता वसीम, अभियंता पवन देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, सोहेल यांच्यासह कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. सुरुवातीला अतिक्रमण हटविताना विरोध झाला. अतिक्रमण धारकांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान एका व्यक्तीने पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी तातडीने धाव घेत त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, अतिक्रमण हटविताना गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया नानलपेठ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. या मोहिमेत एकूण सात पक्के अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या साह्याने जमीनदोस्त केल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

मोहिमेस केला विरोध

अतिक्रमणे काढण्यासाठी पथक दाखल झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश गायकवाड हे अतिक्रमणधारकांना समजावून सांगत असतानाच एक जण त्यांच्या अंगावर धावून आल्याचा प्रकार घडला. इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन त्यास बाजूला केले. अतिक्रमण मोहिमेस विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तक्रार देण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Seven encroachments on Jintur Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.