परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी
By मारोती जुंबडे | Updated: September 27, 2025 14:00 IST2025-09-27T13:59:30+5:302025-09-27T14:00:26+5:30
परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे

परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी
परभणी: जिल्ह्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कहर कोसळला आहे. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पालम व गंगाखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील तब्बल २१ महसूल मंडळांत शनिवारी अतिवृष्टीची नोंद झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गत पंधरा दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती, रस्ते, गावे व पायाभूत सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच शनिवारी गंगाखेड तालुक्यातील जवळा येथील हनुमान मंदिरावर वीज पडून शिखराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खळी गावात पाणी शिरल्याने दोन शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले.
पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे गोदावरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने नांदेड–पूर्णा राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याच भागात दोन जनावरे पुरात अडकली. गंगाखेड–राणीसावरगाव रस्ता गळाटी नदीला पूर आल्याने मध्यरात्रीपासून बंद आहे, तर गंगाखेड–पालम रस्त्यावर केरवाडी नजीक नदीला पूर आल्याने वाहतुकीवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यामुळे गंगाखेड–लोहा, गंगाखेड–रावराजुर, गंगाखेड–बडवणी या मार्गांवरील हालचाल ठप्प झाली आहे.
दरम्यान, पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने पूयणी गाव थेट पाण्याच्या वेढ्यात आले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मात्र, सलग पावसामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले असून तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.
पालम,गंगाखेडात शनिवारी विक्रमी पाऊस
पालम तालुक्यातील पालम १५३.३, चाटोरी १४३.०, बनवस १३९.८, रावराजुर ११३.० आणि पेठशिवणी १११.५ या महसूल मंडळांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव १४३.०, पिंपळदरी १११.३ व गंगाखेड शहर १०६.३ येथे मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्हाभरात पाणीच पाणी झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
तालुका निहाय पावसाची नोंद २४ तासांत):
परभणी तालुका (मि.मी)
दैठणा ७९.० मि.मी.
पिंगळी ६५.८
परभणी ग्रामीण ६५.८
गंगाखेड तालुका
गंगाखेड १०६.३
महादपुरी ९१.५
माखणी ८२.३
राणीसावरगाव १४३
पिंपळदरी १११.३
पूर्णा तालुका
पूर्णा ७५.०
ताडकळस ९७.८
लिमला ७७.०
कातनेश्वर ६७.५
चुडावा ८५.८
कावलगाव ९९.८
पालम तालुका
पालम १५३.३
चाटोरी १४३.०
बनवस १३९.८
पेठशिवणी १११.५
रावराजुर ११३.०
सोनपेठ तालुका
आवलगाव ६५.८
वडगाव ७६.८