परभणी : आदेश डावलून व्यवहार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:48 PM2020-03-23T22:48:13+5:302020-03-23T22:48:50+5:30

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत आहे. यासाठी एक-एक प्रतिबंधात्मक आदेश काढत असले तरी नागरिकांनी मात्र अजूनही या संदर्भात गांभीर्याने घेतले नसल्याचे सोमवारच्या जिल्ह्यातील वातावरणावरुन दिसून आले. दिवसभर रस्त्यावर वाहतूक सुरु होती. कुठलेही निर्बंध पाळले जात नसल्याने या संदर्भात नागरिकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Parbhani: The transaction starts with the command down | परभणी : आदेश डावलून व्यवहार सुरूच

परभणी : आदेश डावलून व्यवहार सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत आहे. यासाठी एक-एक प्रतिबंधात्मक आदेश काढत असले तरी नागरिकांनी मात्र अजूनही या संदर्भात गांभीर्याने घेतले नसल्याचे सोमवारच्या जिल्ह्यातील वातावरणावरुन दिसून आले. दिवसभर रस्त्यावर वाहतूक सुरु होती. कुठलेही निर्बंध पाळले जात नसल्याने या संदर्भात नागरिकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक आदेश काढले आहेत. त्यापैकी कलम १४४ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घातला आहे. असे असतानाही शहरात मात्र या नियमांचे पालन झाले नाही. जनता कर्फ्यू यशस्वी केल्यानंतर सोमवारी नागरिक बिनधास्तपणे शहरातून वावरत होते. विशेष म्हणजे मास्क बांधून अथवा रुमाल बांधून वावरणे अपेक्षित असताना अनेकांनी मास्क, रुमालाचा वापर केला नाही. नानलपेठ, शिवाजी चौक, स्टेशनरोड या भागात रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. अत्यावश्यक वस्तूंमध्ये येणारी दुकाने सुरु होती. या दुकानांसह फळे, भाजीपाल्याच्या गाड्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी नागरिक मात्र अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचेच सोमवारच्या परिस्थितीवरुन दिसत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातही हीच परिस्थिती पहावयास मिळाली.
कृषी विद्यापीठात ७० टक्के कर्मचारी
४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकीकडे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे आदेश दिले असताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मात्र सोमवारी ७० टक्के कर्मचारी उपस्थित होते. याबाबतची माहिती उपकुलसचिव पी.के.काळे यांनी दिली. कृषी विद्यापीठात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ४३ गार्ड नियुक्त असून एकाही गार्डला सुटी देण्यात आली नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
पाथरी, गंगाखेड, सेलू, पालम रस्त्यांवर चेकपोस्ट सुरु
४जिल्ह्यात सीमाबंदीचे आदेश दिल्यानंतर सायंकाळी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट सुरु करीत जिल्ह्यात दाखल होणाºया वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली. परभणी जिल्ह्याची हद्द असलेल्या पालम- लोहा रस्त्यावरील पेठशिवणी येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चेकपोस्ट लावण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार ज्योती चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, सचिन इंगेवाड आदींची उपस्थिती होती. सोनपेठ तालुक्यातून जाणाºया परळी-गंगाखेड रस्त्यावर उक्कडगाव मक्ता येथे हद्द बंद करण्यात आली. पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथेही चेकपोस्ट तयार करण्यात आला असून वाहनांची तपासणी केली जात असल्याचे तहसीलदार कागणे यांनी सांगितले. गंगाखेड तालुक्यातून राणीसावरगावमार्गे अहमदपूरकडे जाणाºया रस्त्यावर राणीसावरगाव येथे चेकपोस्ट तयार करण्यात आला. तहसीलदार स्वरुप कंकाळ, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कानगुले, पोलीस नाईक प्रदीप सपकाळ, लक्ष्मण कांगणे, बालाजी लटपटे, गजानन शिंदे आदी उपस्थित होते. देवगावफाटा: औरंगाबाद-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर देवगावफाटा येथे रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पथक लावून सीमा हद्द बंद करण्यात आली. चारठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळवंत जमादार यांनी डी.एस.जानगर व अजय रासकटला यांची तर तहसीलदार शिवाजी शेवाळे यांनी एस.डब्ल्यू. गोडघासे, एस.टी. नवघरे, दत्ता कºहाळे यांचे पथक सरहद्दीवर नियुक्त केले आहे.
आरतीच्या कार्यक्रमाला बाभळगावात मोठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी: जिल्ह्यात कलम १४४ लागू असतानाही बाळूमामाच्या तब्बल ५ हजार मेंढ्या, रथ आणि ४५ जणांचे वास्तव्य पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतात असून या ठिकाणी चार दिवसांपासून सकाळी व सायंकाळी आरती होते. या आरतीसाठी भाविकांची गर्दीही होत आहे. ही बाब ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांनी पोलिसांना सांगितल्यानंतर २३ मार्च रोजी पोलीस निरीक्षक के.पी.बोधगिरे, पोकॉ.सम्राट कोरडे, ग्रामसेवक संदीपान घुंबरेयांनी घटनास्थळी भेट दिली. गर्दी होईल, असा कोणताही कार्यक्रम न घेण्याची तंबी पोलिसांनी दिली.
पाथरीत रेलचेल
४पाथरी शहरातही ठिकठिकाणी फळ विक्रेते रस्त्याच्या कडेला फळांची विक्री करीत होते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली. पोलिसांचे मात्र यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे दिसून आले.
जिल्हा सीमा बंद करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी काढला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सीमा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्याच प्रमाणे १४४ कलमही जिल्ह्यात लागू केले आहेत. या कलमांतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीमाबंदीचा महत्वपूर्ण निर्णय २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व सीमा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्याचे नागरिक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई व इतर महानगरांतून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे सर्व आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

Web Title: Parbhani: The transaction starts with the command down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.