परभणी पोलीस अॅक्शन मोडवर! सेलूतील पोक्सोच्या गुन्ह्यात सखोल तपासासाठी 'पाच पथके' नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:49 IST2025-10-06T12:48:26+5:302025-10-06T12:49:09+5:30
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे मुख्य जबाबदारी

परभणी पोलीस अॅक्शन मोडवर! सेलूतील पोक्सोच्या गुन्ह्यात सखोल तपासासाठी 'पाच पथके' नियुक्त
सेलू (जि. परभणी) : सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री पोक्सोअंतर्गत चार जणांवर गुन्हा नोंद झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस विभागाने गांभीर्याने घेतले आहे. त्याच्या सखोल आणि प्रभावी तपासासाठी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तपासाची मुख्य जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्याकडे दिली असून, त्यांना सहकार्य करण्यासाठी पाच विशेष तपास पथके गठीत केली आहेत.
सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी संतोष मलसटवार, नितीन परदेशी हे पोलिस कोठडीत आहेत. तर विधीसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात आहे. अन्य एक अनोळखी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील विशेष तपास पथकात तपासाचे मुख्य कामकाज पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्याकडे दिले आहे. तपासकामी मदतीसाठी कोतवालीचे सपोनि. एस. एम. शिंगाडे, ‘भरोसा’च्या सुप्रिया बेहले, अहिल्या जाधव, कागदपत्रे तयार करण्यास पोउपनि. गणेश पवार, शेळके, रासकटला तर सायबरच्या मदतीसाठी पोउपनि आदित्य लाकुळे, सपोउपनि संतोष वाव्हळ, बालाजी रेड्डी तर फॉरेन्सिकसाठी सपोनि राम मुजे, पोशि कोनगुलवार, पांचाळ, स्वामी यांची नियुक्ती केली आहे.
या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सायबर आणि फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करून घटनास्थळातील पुरावे, इलेक्ट्रॉनिक माहिती आणि अन्य आवश्यक साक्षी एकत्र करण्यात येत आहेत. यामुळे गुन्ह्याशी संबंधित सर्व पैलूंची छाननी, दोषींना न्यायाच्या कठोर कारवाईखाली आणणे, यासाठी पोलिस यंत्रणा सजग झाली आहे. तपास पथकाद्वारे दररोज करण्यात येणाऱ्या प्रगतीची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिली जात आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने गुन्ह्याचा त्वरित व निष्पक्ष तपासावर भर दिला आहे. या विशेष तपास पथक स्थापनेमुळे गुन्ह्याच्या गांभीर्याला आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईस मदत होणार आहे.