चहासाठी थांबले अन् नवरी पळाली; एजंटने जुळवलेल्या लग्नात पुण्याच्या कुटुंबाची फसवणूक, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:43 IST2025-12-05T17:41:28+5:302025-12-05T17:43:15+5:30
फसवणूक झाल्यावर कुटुंब थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालं आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

चहासाठी थांबले अन् नवरी पळाली; एजंटने जुळवलेल्या लग्नात पुण्याच्या कुटुंबाची फसवणूक, दोघांना अटक
Parbhani Crime: परभणी शहरात लग्न जुळवण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील एका कुटुंबाची ३ लाख २५ हजारांची आर्थिक फसवणूक करून बनावट नवरी दागिन्यांसह फरार झाली. त्यामुळे सोईरीक जुळवण्याच्या नावाखाली मोठी प्लॅनिंग करुन फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला मध्यस्थांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
पुण्यातील किरण रोहिदास मोरे व त्यांचे नातेवाईक पालम शहरात मुलगी पाहण्यासाठी आले होते. याचदरम्यान त्यांचा संपर्क एजंट मंडळींशी आला. यात काही महिलादेखील होत्या. त्यांनी आधीच सरला कोलते या नावाने बनावट आधार कार्डासह बनावट नवरी तयार ठेवली होती. मोरे कुटुंबाला मुलगी दाखवण्यात आली. मुलगी पसंत झाल्यानंतर विवाहाची तयारी चालू असल्याचे सांगून २ लाख ९० हजार रोख व ३५ हजार किमतीचे मंगळसूत्र आणि जोडवे दागिने घेतले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरात लग्न लावून दिले.
चहासाठी थांबले अन् नवरी पळाली
त्यानंतर नवरा–नवरीला कारमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र, खरा घात यानंतरच झाला. त्यांच्या मागे दुसरी गाडी संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवरदेव आनंदात नवीन संसाराची स्वप्ने पाहत होता, पण त्याच्या कुटुंबाला कल्पना नव्हती की, त्यांच्या गाडीचा पाठलाग करणारी दुसरी गाडी ही खोटं लग्न लावून देणाऱ्या टोळीतील लोकांची आहे. अंबाजोगाई येथे नवरदेवाने चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. हीच संधी साधून नववधूने क्षणाचा विलंब न लावता दागिण्यांसह मागच्या गाडीतून पळ काढला.
नवरीचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने नवरदेवाच्या कुटुंबीयांनी शेवटी पालम पोलीस स्टेशन गाठले. पाठलाग करणाऱ्या गाडीतून नवरी फरार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
पोलिसांनी दोघींना घेतले ताब्यात
पोलिसांनी दोन महिला एजंटांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात ११ आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या लग्नाच्या अडचणीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.