अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परभणीत हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:21 AM2021-02-25T04:21:36+5:302021-02-25T04:21:36+5:30

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी पहाटे ५ पासून रांगेत टोकण मिळविण्यासाठी उभे ...

Parbhani care for the disabled to get a disability certificate | अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परभणीत हेळसांड

अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परभणीत हेळसांड

googlenewsNext

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी पहाटे ५ पासून रांगेत टोकण मिळविण्यासाठी उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणीत दिव्यांगांची हेळसांड होत असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत समोर आले.

दिव्यांगांना शैक्षणिक, प्रवेश व नोकरीसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. यासाठी दृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहू दिव्यांगता यासारखे जवळपास १५ प्रकारांतील दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जाते. कोरोनाकाळात बंद असलेले परभणी येथील अपंग बोर्ड मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग रुग्णालयात दर बुधवारी आरोग्य तपासणीसाठी दिव्यांगांना दिवस राखून दिला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पहाटे ५ पासूनच टोकण मिळविण्यासाठी दिव्यांगांना व त्यांच्या नातेवाईकांना रांगेत उभे रहावे लागते. त्यानंतर तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात येतो. त्यामुळे परभणी येथील रुग्णालयात दिव्यांगांची प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सध्या तरी हेळसांड सुरू असल्याचे बुधवारी दिसून आले.

दररोज केवळ ६० प्रमाणपत्रे

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात असलेल्या अपंग बोर्ड प्रशासनाकडून दर बुधवारी केवळ ६० दिव्यांगांची तपासणी करण्यात येते. विशेष म्हणजे भल्यापहाटे १०० हून अधिक दिव्यांग टोकण मिळविण्यासाठी रांगेत उभे असतात. ज्यांना टोकण मिळाले नाही, त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.

सोशल डिस्टन्सचा फज्जा

अपंग बोर्ड प्रशासनाकडून दिव्यांगांसाठी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही. बुधवारी केलेल्या पाहणीत भल्या पहाटे आलेल्या १०० हून अधिक दिव्यांगांपैकी केवळ ६० जणांना आत घेण्यात आले. या दिव्यांगांना अपंग बोर्ड कार्यालयासमोर बसविण्यात आले.

या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडूनही याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत किंवा त्यांना मास्क व सॅनिटायझरही देण्यात आले नाही. त्यामुळे अपंग बोर्डाचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रशासनाकडून बुधवारी दिव्यांगांची हेळसांड झाली.

अपंग प्रमाणपत्र कशासाठी?

सध्या नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गर्दी केली होती.

सध्या आरोग्य विभागासह इतर विभागांतील जागा निघाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवार बुधवारी आल्याचे दिसून आले.

केंद्र व राज्य शासनाचा लाभ मिळविण्याबरोबर एसटी महामंडळाचा बस प्रवास सवलतीसाठी या प्रमाणपत्राची गरज असते.

Web Title: Parbhani care for the disabled to get a disability certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.