परभणी : मांडवा येथे ४ एकरावरील केळीची बाग करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:17 IST2019-05-18T00:06:59+5:302019-05-18T00:17:08+5:30
सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

परभणी : मांडवा येथे ४ एकरावरील केळीची बाग करपली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. तसेच पावसाअभावी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. परिणामी सिंचनासह पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आतापर्यंत फळबागा जगविल्या. मात्र दोन महिन्यांपासून भूजलपातळीत मोठी घट झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. मांडवा येथील केशव उद्धवराव आरमळ व रघुनाथ उद्धवराव आरमाळ यांनी चार एकरवर केळीची लागवड केली होती; परंतु, पाण्याअभावी केळीची झाडे करपली आहेत. फळबाग लागवड करण्यासाठी आतापर्यंत ३ लाख रुपयांचा खर्च झाला. निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले असते तर या बागा वाचल्या असत्या; परंतु, अद्यापपर्यंत पाण्याचे नियोजन नसल्याने केळीच्या बागा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, आरमळ यांनी या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले असून जळालेल्या केळी बागांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
विमा संरक्षण नसल्याने शेतकºयांना बसतोय फटका
४फळपिकांना विम्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र बागायती शेतीसाठी विमा संरक्षण नसल्याने झालेले नुकसान शेतकºयांनाच सहन करावे लागत आहे.
४तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या भागातील बागायती पिकांचा पंचनामा करुन हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी बागायतदार शेतकºयांकडून केली जात आहे.