Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना पोक्सोअंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:11 IST2025-11-25T13:10:55+5:302025-11-25T13:11:20+5:30
सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांनी पीडितेचे अल्पवयीनत्व सिद्ध केले.

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना पोक्सोअंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी
परभणी : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष तद्र्थ जिल्हा न्यायालयाने दोन आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावत न्याय दिला. २४ नोव्हेंबरला विशेष तद्र्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भरणे यांनी हा निर्णय दिला.
पीडित मुलगी ही आपल्या आजीकडे राहत होती. तब्येत बिघडल्याने सरकारी दवाखाना, परभणी येथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. विश्वासात घेतल्यावर पीडितेने सांगितले की, एप्रिल २०२४ पासून आरोपी शैलेश हरिभाऊ घोगरेने तिला गावातील दुसऱ्या आरोपी गजानन मारोती घोगरे यांच्या घरात नेऊन मनाविरुद्ध सतत लैंगिक अत्याचार केले. अत्याचाराच्या वेळी आरोपी गजानन हा पहारा म्हणून घराबाहेर बसविला जात असे. याप्रकरणी पीडितेच्या आजीच्या जबाबावरून पोलिस ठाणे जिंतूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. पुंड यांनी केला, तर त्यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड यांनी मदत केली. तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे ॲड. बाबासाहेब घटे यांनी बाजू मांडत एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांनी पीडितेचे अल्पवयीनत्व सिद्ध केले. तसेच आरोपी शैलेश घोगरे यांनी सतत लैंगिक अत्याचार केल्याचे आणि आरोपी गजानन घोगरे यांनी गुन्हा करण्यास मदत केल्याचे संशयापलीकडे सिद्ध केले. यावरून दोन्ही आरोपींना कलम ४, पोक्सोअंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी तसेच ५,००० रुपये दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
कार्यवाहीदरम्यान पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, आकाश रेड्डी, वंदना आदोडे यांनी कामकाज सुरळीत पार पाडले.