Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:47 IST2025-09-27T11:44:10+5:302025-09-27T11:47:00+5:30
तीन आरोपी ६५ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात

Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत
परभणी : वाहनाचा बनावट अपघात करून वाहन चालकाने गाडीतील ८८ लाख १७ हजारांचे दारूचे बॉक्स लंपास केले होते. या प्रकरणात अपघाताची खोटी तक्रार दिल्याची बाब तपासात उघडकीस आली. सहायक पोलिस अधीक्षक जिंतूर आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपासात तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६५ लाख ३९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा अनिल घुगे या दोघांनी त्यांचा ट्रक क्रमांक (एमएच १५ जीबी १७३५) मध्ये नाशिक येथील सिंड्राम कंपनी येथील विविध कंपनीचे एक कोटी ३८ लाखांचे विदेशी दारूचे बॉक्स अलका वाईन शॉप नांदेडला पोहोचविण्यासाठी ३१ ऑगस्टला निघाले होते. वाटेतच त्यांनी या वाहनातून इतर साथीदारांच्या मदतीने ८८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल अफरातफर करून हडप केला. वाहन स्वतःहून जिंतूर हद्दीतील चिंचोली दराडे शिवारात उद्देशपूर्वक पलटी केले व त्यातील दारूचे बॉक्स स्थानिक लोकांनी काढून घेतल्याचा बनाव केला व जिंतूर पोलिस ठाण्यात अपघात झाल्याची खोटी तक्रार दिली होती.
गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्याकडे दिला. बेनिवाल यांनी घटनास्थळाची पाहणी व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. सदर वाहनाचा अपघात झाला नसून ही फिर्याद खोटी असल्याचा निष्कर्ष काढला. यानंतर मुख्य आरोपी प्रभाकर घुगे यास पुणे येथील शिक्रापूर येथून ताब्यात घेत तपास केला. त्याने पोलिस कोठडी दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्ह्यात अफरातफर करून लंपास केलेले दारूचे बॉक्स काढून मुख्य आरोपीस गुन्ह्यात मदत करणाऱ्या अनिल चव्हाण (मंठा), रवींद्र पवार (रा.डांबरी, ता.जालना), सचिन सोळंके (वाटुर जि.जालना) अशा तिघांना ६५ लाख ३९ हजार ७२० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल, उपनिरीक्षक जगदीश मेहेत्रे, अंमलदार गजानन राठोड, विक्रम उकंडे, आकाश काळे, यशवंत वाघमारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनि.पांडुरंग भारती, जगताप, सुनील अंधारे, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सिद्धेश्वर चाटे, विलास सातपुते, गायकवाड, घुगे, पौळ, इमरान, आदित्य लोकुळे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांच्यासह जालना येथील पथकाने केली.