परभणीत भाजपा कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:17 AM2018-05-18T05:17:51+5:302018-05-18T13:31:17+5:30

पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे वेळ देऊनही कार्यालयात उपस्थित न झाल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी परभणीत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

 Offices of the party workers from BJP workers | परभणीत भाजपा कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयाची तोडफोड

परभणीत भाजपा कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयाची तोडफोड

Next
ठळक मुद्देपीक विम्यावरून घडला प्रकार वेळ देऊनही कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे न भेटल्याने केली जोरदार तोडफोड

परभणी : पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे वेळ देऊनही कार्यालयात उपस्थित न झाल्याने संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परभणीत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना १७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. 

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याला पीक विमा कमी मिळाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे विमा योजनेचे जिल्ह्याचे सचिव असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत केलेल्या कापणी प्रयोगाचा अहवाल द्यावा तसेच प्रोसेडिंगची मागणी करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते १७ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जुना पेडगावरोड भागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दाखल झाले. जि.प.तील भाजपाचे गटनेते डॉ.सुभाष कदम, मेघना बोर्डीकर, रमेशराव गोळेगावकर, राधाजी शेळके यांच्यासह १२ ते १५ गावांमधील शेतकरी यावेळी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे  कार्यालयात उपस्थित नसल्याने ही सर्व मंडळी उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.सुखदेव यांच्या कक्षात बसली. पीक कापणी प्रयोगाची प्रोसेडिंग देण्याची मागणी यावेळी सुखदेव यांच्याकडे करण्यात आली. तसेच पीक विम्याच्या प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांच्यासोबत चर्चा करावयाची आहे, त्यांना बोलवा, असे सुखदेव यांना सांगण्यात आले.

याबाबत शिंदे यांना मोबाईलवर निरोप दिल्यानंतरही ते कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते साडे चार तास ठाण मांडून त्यांची वाट पाहत बसले. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे हे कार्यालयात येत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव यांच्या कक्षातच गोंधळ घातला. कक्षातील खुर्च्या, टेबलची मोडतोड सुरू केली. याच दरम्यान कार्यालयाच्या मुख्य गेटलाही कुलूप ठोकण्यात आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चोंचलकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकूण घेत तक्रार नोंदविण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि अधिकारीही नानलपेठ पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. 

दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांच्या चुकीमुळे जिल्ह्याला पीक विमा कमी मिळाला आहे. त्यामुळे अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गुरुवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन भाजपाच्याच कार्यकर्त्याना मारहाण करण्यात आली, असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

पोलिसांत गुन्हा दाखल 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शिंदे यांच्या सांगण्यावरूनच मारहाण
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांनी वेळ दिला असल्याने आम्ही कार्यालयात दाखल झालो़ परंतु, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते आले नाहीत़ शेवटी शिंदे यांनीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन केला़ शेतकऱ्यांना फोडून काढा, असे त्यांनी फोनवरून सांगितले़. त्यानंतर आम्हाला मारहाण झाली. त्यात ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. पीक विमा प्रकरणात कृषी कार्यालयाने चुकीचे अहवाल दिल्याने जिल्ह्याचे नुकसान झाल्याचे रमेशराव गोळेगावकर यांनी सांगितले़. 

या संदर्भात बोलताना भाजपाचे जि़प़तील गटनेते डॉ़ सुभाष कदम म्हणाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने चुकीचा अहवाल दिल्यामुळेच परभणी जिल्ह्याला कमी विमा मिळाला आहे़ जिल्ह्यातील ३७ मंडळांपैकी २३ मंडळांचा विमा नामंजूर करण्यात आला आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांनी पीक कापणी प्रयोग, पिकांचे उत्पन्न हे चुकीचे दाखविले़ त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहिले़ या प्रश्नी आम्हाला न्यायालयात जाणे आवश्यक असल्याने प्रोसेडिंग, पीक कापणीचा अहवाल, स्टेटमेंट आदी कागदपत्रांची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालासाहेब शिंदे यांच्याकडे करीत आहोत़ २१ दिवसांपासून मागणी करीत असतानाही शिंदे हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत़

गुरुवारी दुपारी त्यांनीच आम्हाला चर्चेसाठी वेळ दिल्याने आम्ही येथे आलो़ परंतु, ते स्वत: उपस्थित नव्हते़ फोनवरही उत्तरे देत नाहीत़ या प्रकरणातील अहवाल दिल्यास चूक उघडी पडणार असल्याने टाळाटाळ केली जात आहे़ आम्ही चर्चा करण्यासाठी आलो असताना शिंदे यांच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण करण्यात आली़ त्यात माझ्यासह रमेशराव गोळेगावकर, भानुदास शिंदे, माऊली कदम, विश्वांभर गोरवे यांना मार लागला आहे. 

दडपशाही करण्याचा प्रकार अशोभनीय

भाजपने कृषी कार्यालयात केलेले आंदोलन अशोभनीय आहे़ राज्यात आणि केंद्रात भाजपाचीच सत्ता आहे़ भाजपाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांविषयी खरेच कनवळा असेल तर त्यांनी मुंबई आणि दिल्लीत जाऊन प्रयत्न केले पाहिजेत़ मात्र तसे न करता केवळ शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाभरात आंदोलन केल्यामुळे गुरुवारी केवळ दिखावा करण्यासाठी भाजपाने आंदोलन केले़ शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांनी शासन दरबारी भांडण्याऐवजी अधिकाऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रकार अशोभनीय आहे़ 
- माणिक कदम, मराठवाडा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

रितसर तक्रार देणार

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पीक विम्याच्या संदर्भात कार्यालयात दाखल झाले़; परंतु, हा विषय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संदर्भातील असल्याने मी त्यांना कार्यालयात बसून घेतले़. कृषी विभागाच्या सहसंचालकांशी बोलणे करून दिले़. कार्यकर्ते मागत असलेले अहवाल काढत असतानाच ही तोडफोड झाली़ या संदर्भात रितसर तक्रार दिली जाणार आहे़. 
-आऱ. टी़ सुखदेव, उपविभागीय कृषी अधिकारी, परभणी

Web Title:  Offices of the party workers from BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.