परभणी : महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा वादात अडकल्या आहेत. त्यांनी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ग्रामविकास अधिकाऱ्यास भर सभेत कानाखाली मारण्याची आणि जागेवर बडतर्फ करण्याची भाषा वापरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला असून, सभेला घरकुलाचे लाभार्थी न आणल्याने राज्यमंत्र्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला अशा धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
मागच्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे असे नाव लिहिलेला दारुचा ट्रक जप्त करण्यात आला होता. त्यानंतर तो नातेवाईकाचा असून, त्यातील मुद्देमाल वैध असल्याची सावरा सावर करण्यात त्यांना बरीच कसरत करावी लागली. यावरून अनेकांनी वेगवेगळे आरोपही केले होते. या प्रकरणाची शाइ वाढत नाही, तोच काल जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सभेत त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
काय म्हणाल्या मेघना बोर्डीकर?या ठिकाणी बाजार समितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करण्यात आले. यावेळी मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला चांगलेच झापले. त्या म्हणाल्या, याद राख ही मेघना बोर्डीकर आहे. तुला पगार कोण देतंय? माझ्यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही. तू या गावात काय कारभार करतोस, हे मला माहित आहे. असा वागला तर कानाखाली वाजवीन. तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन. त्यामुळेच मी या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांनाही बोलावले आहे. हमाली करायची तर सोडून दे नोकरी, असेही त्या या ग्रामविकास अधिकाऱ्यास म्हणाल्या.
रोहित पवारांची खोचक टीकाया प्रकाराचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सभागृहात रमी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडे काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे यांच्यामध्ये आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्यांची भर पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.
बोर्डीकरांचे स्पष्टीकरणअर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. हा ग्रामसेवक विधवा महिलांना पैसे मागून त्यांना ग्रामपंचातींमध्ये लुडबुड करणाऱ्या एका नेत्या कडे पाठवून त्यांचा छळ करीत होता. मग त्याची पूजा करायची का? अशा लोकांमुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नसतील तर काय कामाच्या? हा माझा त्रागा होता. आमदाराशी नीट वाग, नाहीतर कानाखाली वाजवीन असे पोलीस अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला शिकवू नये, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.