'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:41 IST2025-09-26T18:35:46+5:302025-09-26T18:41:55+5:30
भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेतली.

'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर
- प्रमोद साळवे
गंगाखेड (परभणी) : प्रचंड मेघगर्जना, तुफानी पाऊस व विजांच्या कडकडाटात सुरू असतानाही अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना भेटीसाठी दिलेला 'पालकत्वा'चा वेळ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.२६) अत्यंत काटेकोरपणे पाळला. तालुक्यातील धारासूर येथे आज दुपारी मंत्री बोर्डीकर यांनी भेट दिली. या नैसर्गिक संकटात पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे, असा धीर त्यांनी अतिवृष्टीग्रस्तांना दिला.
शुक्रवारी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा तालुक्यातील गंगाखेड येथे अतिवृष्टी भागात पूरपरिस्थितीचापूर्वनियोजित प्रशासकीय दौरा होता. नेमका याच कालावधीत धारासूर व परिसरात प्रचंड मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफानी पावसाला सुरुवात झाली. परंतु जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री बोर्डीकर यांनी अशा परिस्थितीतही दुपारी ३:३० वाजता थेट धारासूर गाठले. भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेत नैसर्गिक संकटांचा एकत्रितपणे सामना करू असा दिलासा देत मदतीचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, धारासुरचे सरपंच राजेभाऊ गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप कदम यांचेसह निवृत्ती कदम, दगडू जाधव, अशोक कदम, लक्ष्मण कदम, निवृत्ती कदम, बालासाहेब नेमाने, कृष्णा जाधव, अशोक क्षीरसागर, विश्वनाथ जाधव, प्रदुम शिंदे, दगडू ढेंबरे तसेच तांडा वस्तीतील पुरुष, महिला उपस्थित होत्या.