'हॅलो,आमदार बोलतोय'; बदलीसाठी शिक्षकाचा माजी आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:32 IST2024-12-18T19:25:17+5:302024-12-18T19:32:21+5:30
शिक्षकाचा प्रताप, दोन माजी आमदारांच्या नावे अधिकाऱ्यांना फोन करून अधिकाराबाहेर काम करण्यासाठी दबाव

'हॅलो,आमदार बोलतोय'; बदलीसाठी शिक्षकाचा माजी आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन
मानवत ( परभणी) : येथील एका शिक्षकाने स्वतःला कधी माजी आमदार कपिल पाटील तर कधी त्यांचा पी.ए. असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या अधिकाराबाहेर काम करण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील साईनाथ पोलास यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी संबंधित शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधात 17 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांना मोबाईल क्रमांक 7083405248 वरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने, 'मी आमदार कपिल पाटील बोलतो', असे सांगून, "जिल्हा परिषदेच्या शिक्षिका श्रीमती मुंसाडे यांच्या प्रतिनियुक्तीची फाईल तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे पाठवा," असा आदेश दिला. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याकडे अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर फोन करणाऱ्याने, "मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, फाईल लगेच त्यांच्या कार्यालयात पोचवा," असे सांगितले. त्यानुसार फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली. यानंतर, मोबाईल क्रमांक 7507090333 वरून पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला आमदार कपिल पाटील असल्याचे सांगत, "जिल्हा परिषद प्रशाला, मानवत येथील मुख्याध्यापक छाया गायकवाड यांचा पदभार इतर व्यक्तीला द्या," असे धमकीवजा शब्दांत सांगितले.
दिशाभूल केल्याचे उघडकीस
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर समजले की, प्रतिनियुक्ती फाईल आणि मुख्याध्यापक बदली प्रकरणी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नव्हती. शिक्षणाधिकाऱ्यांनी मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता, तो दत्ता होगे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शिक्षक होगे यांनी आमदार कपिल पाटील यांचे नाव वापरून खोटे बोलून दबाव टाकल्याचा प्रकार उघड झाला. यावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी पोलास यांनी तक्रार दाखल केली आणि शिक्षक दत्ता होगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी एका माजी आमदाराच्या नावानेही फोन
छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनाही पाथरीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाने फोन करण्यात आला होता. फोनवरून, "शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याचा वस्तुस्थिती शोधा," असा संदेश देण्यात आला. शिक्षण उपसंचालकांनी संशय बळावल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्क्रीनशॉट मागवला. तपासादरम्यान, हा फोनसुद्धा शिक्षक दत्ता होगे यांच्याच मोबाईल क्रमांकावरून करण्यात आल्याचे उघड झाले. दत्ता होगे यांनी आमदार कपिल पाटील आणि माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाने दिशाभूल करून चुकीचे काम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.