गोदावरीच्या पुराचा प्रकोप; परभणीत १३ गावांना वेढा कायम, १२३८ जणांना स्थलांतरित केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:44 IST2025-09-25T13:42:32+5:302025-09-25T13:44:47+5:30
गंगाखेड शहराच्या शिवारात गोदावरीचे पाणी घुसले असून बरकतनगर भागातील २०० नागरिकांना बाहेर काढले.

गोदावरीच्या पुराचा प्रकोप; परभणीत १३ गावांना वेढा कायम, १२३८ जणांना स्थलांतरित केले
परभणी : वरच्या भागातील धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे गंगाखेड शहरातील बरकतनगर व इतर भागात पुराचे पाणी घुसले आहे. जिल्ह्यात १३ गावांना पडलेला वेढा कायम असून आज नवीन सहा गावांची भर पडली, तर १२३८ जणांना स्थलांतरित केले.
परभणी जिल्ह्यात भारतीय सेना दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय दिला आहे. गोदावरीच्या पुराचा प्रकोप आधीच पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांतील २८ गावांना फटका देऊन गेला. कालपासून ही गावे पुराचा तडाखा सोसत आहेत. आज पाणी वाढतच चालल्याने आज पालममधील सावंगी भुजबळ, रावराजूर व रोकडेवारी या तीन गावांचा संपर्क तुटला, तर पूर्णा तालुक्यात मुमदापूर शिवारात पूर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या १८ वानरांना सुखरूप बाहेर काढले, तर पूर्णा व गोदावरीच्या पुरामुळे बुधवारी धानोरा काळे ते देऊळगाव दुधाटे, वझूर ते देवठाणा, लक्ष्मीनगर ते पिंपळगाव बा. हे रस्ते वाहतुकीस बंद झाले, तर आलेगाव शिवारात समृद्धी महामार्गाचे तीन कामगार पुरात अडकल्याने त्यांना बाहेर काढले.
गंगाखेड शहराच्या शिवारात गोदावरीचे पाणी घुसले असून बरकतनगर भागातील २०० नागरिकांना बाहेर काढले. परभणी, सेलू, मानवत तालुक्यात दुधना नदीच्या पुरामुळे दोन्ही काठावरील शेतशिवार पाण्याखालीच आहे. जिल्ह्यात ढगफुटीसदृश, अतिवृष्टीचे स्वरूप निर्माण झाले. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे बुधवारीपर्यंत २ लाख ३७ हजार ३४० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, सोयाबीनसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
१६० ग्रामस्थांचे स्थलांतर; तहसीलदार मुक्कामी
मानवत तालुक्यातील थार गावाला पाण्याचा वेढा बसला आहे. १६० जणांच्या स्थलांतरानंतर उर्वरित ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी नकार दिल्याने बुधवारी ०४:०० वाजता मोहीम थांबवण्यात आली. यामुळे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी मंगळवारी रात्री ०८:०० वाजता बोटीने थार गाव गाठून ग्रामस्थांशी संवाद साधून गावातच मुक्कामी राहून परिस्थितीचा आढावा घेतला.