मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:14 IST2017-11-23T18:13:22+5:302017-11-23T18:14:49+5:30
मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे.

मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण
परभणी: मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. ही माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सुरू झाले आहे. मानवत तालुक्यात २०१२ ते २०१७ या कालावधीत ४९ शेतक-यांंनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. सततची नापिकी व कर्ज कसे फेडावे? या विवंचनेतून शेतक-यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुुुंबियांची भेट घेऊन संवाद साधण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आले होते. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या नोंदीप्रमाणे कुटुंबियांच्या भेटी घेऊन त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी विविध प्रकारची माहिती प्रपत्राद्वारे भरून घेण्यात आली. यामध्ये माहिती देणाºयाचे नाव शासनाकडून मदत मिळाली किंवा नाही, किंवा आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे शिक्षण आदी प्रकारची माहिती या प्रपत्राद्वारे घेण्यात आली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, निर्मल स्वच्छतागृह, अंकूर रोपवाटिका, बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिळालेल्या लाभाची माहिती प्रशासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विचारण्यात येत होती़ शिवाय शेतीपासूनचे उत्पन्न, अन्य साधणे, कर्ज, सावकाराचे कर्ज, वीज जोडणी आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
या माहितीचे संकलक पूर्ण झाले असून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे़ जमा केलेली माहिती शासनाच्या वेबपोर्टलवर भरली जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा, प्राधान्यक्रम आदींचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना शेतकरी कुटूंबियांना प्राधान्य देण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
‘तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात आली. ही माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार अश्विनी जाधव यांनी दिली़
१५० कर्मचा-यांची नियुक्ती
तालुकाभरातील ४९ शेतक-यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याच्या विचारात शासन आहे. त्यामुळे तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी १५० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये तहसीलदार अश्विनी जाधव, गटविकास अधिकारी एस.ए. छडीदार, तालुका कृषी अधिकारी माळी, नायब तहसीलदार नकूल वाघुंडे, मोहम्मद वसीम आदींचा समावेश होता. एकाच वेळी हे सर्व अधिकारी नेमून दिलेल्या गावांमध्ये गेले होते.