दुचाकीला उडवलेल्या कारवर पाठीमागून आलेली दुसरी चारचाकी धडकली; चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:41 IST2022-11-09T14:41:18+5:302022-11-09T14:41:34+5:30
मानवत येथे वळण रस्त्यावरील घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान

दुचाकीला उडवलेल्या कारवर पाठीमागून आलेली दुसरी चारचाकी धडकली; चौघे जखमी
मानवत (परभणी) : शहरातील वळण रस्त्यावरील करंजी नाक्याजवळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना तीन वाहनांचा अपघात झाला. या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता झाला.
शहरातील वळणरस्त्यावरून एक कार ( एम एच 22 यू 6759) परभणीकडे जात होती. दरम्यान, वळणावरून एका चारचाकीच्या समोर जाण्याच्या प्रयत्नात कारने मानवतकडून पाथरीकडे जाणाऱ्या दुचाकीला ( एम एच 14 एच बी 7658) उडवले. दुचाकीला उडवल्यानंतर कार अचानक रस्त्याच्या मधोमध आली. याचवेळी पाठीमागून येणारी चारचाकी ( एमएच 22 ए एम 1777 ) कारवर धडकली.
या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण बिटे ( रा. अंधापुरी ता. पाथरी ) जखमी झाला. तसेच चारचाकीतील गणेश बारहाते आणि अन्य तिघे जखमी झाली आहेत. जीवितहानी झाली नसली तरी अपघातात दुचाकी आणि दोन्ही चारचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शेख मुनू, नारायण सोळंके, शेख फय्याज यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.