शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पिठोरी शिरसगाव ते सँटियागो

By admin | Updated: July 24, 2014 20:01 IST

पिठोरी शिरसगाव या गावाचं नाव ऐकलंय तुम्ही? कदाचित ऐकलंही नसेल.मराठवाड्यातलं छोट्टसं गाव

पिठोरी शिरसगाव या गावाचं नाव ऐकलंय तुम्ही?
कदाचित ऐकलंही नसेल. मराठवाड्यातलं छोट्टसं गाव.  त्या गावची ही एक मुलगी, रोहिणी पाष्टे तिचं नाव. 
रोहिणीची भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड झाली आहे आणि लवकरच ती दक्षिण अमेरिकेतल्या सँटियागो शहरात फुटबॉल खेळण्यासाठी जाणार आहे.
भारी वाटलं ना वाचून? कुठे ते पिठोरी शिरसगाव आणि कुठे सँटियागो? कुठं मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातले जेमतेम दोन हजार लोकसंख्येचं एक लहानसं खेडं आणि कुठं सँटियागो, दक्षिण अमेरिकेतल्या चिले देशाची राजधानी.
रोहिणीनं एवढी मोठी सातासमुद्रापार उडी कशी मारली?  कशाच्या जोरावर?
समजून घ्यायचं तर रोहिणीच्या गावात जायला हवं?
आजही मराठवाड्यातल्या अनेक दुष्काळग्रस्त गावातल्या बहुसंख्य घरामध्ये मुलींना शाळेत घातलंच जात नाही, साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षीच मुलींचं लग्न लावून टाकलं जातं. रोहिणीचं गाव या कहाणीला अपवाद नाहीच. अशा परिस्थितीत एखाद्या मुलीनं फुटबॉलसारख्या ‘पुरुषी’ समजल्या जाणार्‍या खेळात प्रावीण्य मिळवणं हीच आश्‍चर्याची गोष्ट आहे.
रोहिणीच्या घरची जेमतेम दोन एकर शेती.  रोहिणीच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला, रोहिणीची आई लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून कसेबसे दिवस ढकलत होती. त्यामुळे मुलींना शाळेत घालण्याची चैन तिला परवडण्यासारखी नव्हती. जबाबदारीतून मोकळं होत तिनं रोहिणीच्या मोठय़ा बहिणीचं चौदाव्या वर्षीच लग्न लावून टाकावं लागलं. मोठय़ा भावाला आजोळी शिक्षणासाठी पाठवलं. रोहिणीला मात्र चौथीत शाळा सोडावी लागली. शेजारी राहणार्‍या काकांना अंबडला नव्यानंच सुरू झालेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयाची माहिती समजली नसती, तर कदाचित रोहिणीदेखील आईसोबत मोलमजुरी करत राहिली असती. रोहिणीच्या आईनं कधी गावाबाहेर पाऊल टाकलेलं नव्हतं, त्यामुळे मुलीला शाळेच्या निमित्तानं बाहेरगावी पाठवणं तिच्या जिवावर आलं होतं. पण त्या निवासी शाळेत रोहिणीच्या शिक्षणाची विनामूल्य सोय होतेय म्हटल्यावर आईनं मन घट्ट करून तिला ३0 किलोमीटर लांब शाळेत पाठवलं.
खेळाच्या तासाला शाळेतल्या शेख सरांनी तिच्यातले गुण हेरले. शाळेतल्या राधा शिंदे या अव्वल खेळाडू मुलीची तिच्याशी मैत्री करून दिली. राधाचा खेळ पाहून तिच्याप्रमाणे फुटबॉल खेळायला सुरु वात केली.
रोहिणी सांगते,  ‘‘या शाळेत प्रवेश मिळाला म्हणूनच मला खेळायची संधी तरी मिळाली. आता खेळाची इतकी आवड लागली आहे की, सुट्टीमध्येदेखील शाळा सोडून घरी जावंसं वाटत नाही.’’ 
शाळेतले सर सांगत की, सुट्टीत घरी गेल्यावर गावातल्या मुलींनी एकत्र येऊन फुटबॉलचा सराव करा. पण खेड्यापाड्यात मुलींनी मैदानात जाऊन खेळणंच कुणाला आजही झेपत नाही. ‘पोरीच्या जातीनं असं उघड्यावर खेळण शोभत नाही.’’ असंच गावात सगळ्यांचं मत. अगदी रोहिणीच्या आईचंही. पण आता रोहिणीची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्यानंतर गावाला खेळाचं महत्त्व हळूहळू पटायला लागलेलं आहे. आता गावात रोहिणीचं अभिनंदन करणारी पोस्टर्स लावलेली दिसतात. तिचा जिल्हापातळीवर सत्कार करण्यात आला, तसाच गावातही सत्कार झाला. शाळेतले कोच रफिक शेख यांचाही गावानं सत्कार केला. त्यावेळी सरांनी गावातल्या मुलांना फुटबॉल भेट दिला. तेव्हापासून गावातल्या मुलांनी माळावर फुटबॉल खेळायला सुरु वात केली आहे. 
निदान रोहिणीमुळे तिच्या गावातलं तरी चित्र बदलतंय. ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात रोहिणीच्या शाळेनं दुसरा क्र मांक मिळवला. त्या सामन्यातला खेळ पाहून ‘स्लम सॉकर’ संस्थेच्या प्रतिनिधींनी तिची विशेष दखल घेतली. 
‘स्लम सॉकर’ ही संस्था देशभरात वंचित वर्गातील मुलामुलींना खेळांच्या माध्यमातून विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करते. देशभरात या दृष्टिकोनातून या संस्थेतर्फे विविध उपक्र म चालवले जातात. या संस्थेतर्फे नागपूरला झालेल्या चाचणीमध्ये रोहिणीची निवड सँटियागो शहरात ऑक्टोबरमध्ये होणार्‍या ‘होमलेस वर्ल्ड कप फुटबॉल’साठी खेळणार्‍या भारतीय संघात झाली आहे. जगातल्या ६४ देशांतून अगदी आव्हानात्मक परिस्थितीत जगणारी ५00 पेक्षा जास्त मुलं-मुली हा वेगळा वर्ल्ड कप खेळायला येणार आहेत.  या स्पर्धेच्या निमित्तानं रोहिणीला वेगळं जग पहायला मिळेल, तिच्या आकांक्षांना नवे क्षितिज मिळेल. आणि तिच्या गावपरिसरातून अजून एखादी रोहिणी बनायला पुढे येईल, अशी आशा आहे.
- वंदना खरे