पुरुषी व्यवस्थेविरुद्ध पाकिस्तानी फैजाची बहादुर जंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 07:15 AM2019-09-19T07:15:00+5:302019-09-19T07:15:06+5:30

ती पोलीस, तरी एकानं तिला जाहीर मारझोड केली. न्याय मागितला तर मिळाल्या शिव्या. पाकिस्तानातल्या त्या पोलीस ऑफिसरनं आता नवी जंग सुरू केली आहे.

Pakistani woman police officer slapped by lawyer demands justice | पुरुषी व्यवस्थेविरुद्ध पाकिस्तानी फैजाची बहादुर जंग!

पुरुषी व्यवस्थेविरुद्ध पाकिस्तानी फैजाची बहादुर जंग!

Next
ठळक मुद्दे जिथे महिला पोलिसांना बेदम मारलं जातं, तिथे जनतेची सुरक्षा कोण करणार?

- कलीम अजीम 

धिप्पाड दिसणारा एक पुरुष. त्याच्या दोन्ही हाताला बेडय़ा. त्या बेडय़ाचा दोर एका तरुणीच्या हातात. ही तरु ण मुलगी त्या पुरुषाला फरफटत कुठेतरी घेऊन जात आहे. विजयीमुद्रेत असलेला तो तरुण निमूटपणे त्या मुलीच्या मागे-मागे चालतोय. काही सेकंदांचा हा व्हिडीओ गेल्या आठवडय़ात प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, ट्विटर, यू-टय़ूब आणि व्हॉट्सअ‍ॅपवर या व्हिडीओचा धुमाकूळ. ट्विटरवर याच घटनेचा एक फोटो तुफान गाजतोय. फोटोत त्या तरु णीच्या चेहर्‍यावर अभिमानाचे भाव दिसत आहेत. किंचितसं समाधान. ती तरुणी हळूहळू चालत पुढे जात आहे.
तर ही कथा अशी.
तरुणीचे नाव फैजा नवाज. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फेरोजेवाला शहरात ती एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. तिच्याशी अभद्र वर्तन केल्याच्या आरोपावरून एका विकृत माणसाच्या मुसक्या तिने आवळल्या होत्या. फैजा पोलीस असून, त्यानं फैजाला बेदम मारहाण केली होती. तीही सार्वजनिक ठिकाणी.
तक्रार दाखल झाल्यानंतर अहमद मुख्तार नावाच्या विकृताला अटक झाली. फैजा नवाज त्याला त्वरित बेडय़ा ठोकून पोलीस स्टेशन ते कोर्ट असं फरफटत घेऊन जाते. फैजाला पाहून फोटो काढणार्‍यांनी एकच गर्दी केली. एकाएकी शेकडो मोबाइल कॅमेरे फैजाकडे वळले. काहीच सेकंदांत फैजा नवाजचे व्हिडीओ आणि फोटो ट्विटर, फेसबुकवर व्हायरल झाले. 25 वर्षीय फैजा देशभरात पोहोचली.
बघता बघता पाकिस्तानातून फैजा नवाजच्या धाडसाचे कौतुक सुरू झाले. प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांकडून फैजाचे फोटो कॅप्शनसह शेअर, ट्विट-रिट्विट केले गेले. अशा रीतीने फैजा काहीवेळातच टॉप ट्रेण्डला पोहोचली. अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. पण तिचे ते धाडस अल्पायुषी ठरले. कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला. एफआयआरमध्ये चुकीचे नाव नोंदवल्याचा युक्तिवाद जामीन मिळविण्यासाठी पुरेसा ठरला.
क्षणार्धात फैजा नवाज एकटी पडली. तिने एका व्हिडीओ मेसेजद्वारे आप बिती सांगितली. कोर्ट परिसरातून जारी केलेल्या संदेशात ती म्हणते, ‘चेकिंग पॉइंटजवळ गाडी पार्क  करण्यास रोखले असता त्याने मला लाथा-बुक्क्याने मारले. कोर्टाने माझी बाजू ऐकून न घेताच त्याला जामीन मंजूर केलाय. आता मी कुणाकडे तक्रार करू. माझे ज्येष्ठ सहकारी गप्प राहण्याची भाषा बोलत आहेत. मला न्याय कोण मिळवून देणार?’
सहकारी व वरिष्ठांनीदेखील फैजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. फैजाचा आरोप आहे की, आरोपीच्या दबावाखाली त्यांनी तिची साथ सोडली. तिच्या सहकार्‍यांनीच जाणून-बुजून एफआयआरमध्ये चुकीचे नाव नोंदवले, असे ती जिओ न्यूजला दिलेल्या फोनोत म्हणते. डॉन न्यूजच्या बातमीत ती उद्विग्न होऊन म्हणते, ‘मला न्याय मिळेल अशी कुठलीच शक्यता दिसत नाही. मला पोलिसी सेवेचा राजीनामा द्यावासा वाटतो. मी प्रचंड निराश आहे. मला आत्महत्या कराविशी वाटते. ताकदीच्या जोरावर तो माणूस बाहेर आला. त्याने माझ्याशी सार्वजनिक स्थळी र्दुव्‍यवहार केला आहे. एका महिला पोलिसाला मारहाण करणं गुन्हा नाही का?’
फैजा नवाज एक उच्चशिक्षित तरु णी आहे. ती 2014 साली एकाचवेळी पंजाब पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि त्याचवेळी काउण्टर टेररिझम डिपार्टमेंटमध्ये निवडली गेली होती. आपल्या व्हिडीओ संदेशात ती म्हणते, ‘मोठय़ा अभिमानाने मी पोलिसात सामील झाले होते. मला समाजाला आणि विशेषतर्‍ महिलांना न्याय मिळवून देण्याची इच्छा होती; पण आज माझेच लोक माझ्याविरोधात उभे राहिले आहेत. अशावेळी मी काय करावे?’
आरोपी अहमद मुख्तारने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तो म्हणतो, ‘मी काय हातगाडीवाला आहे का, तिची हिंमत कशी झाली मला रोखायची? मला बेडय़ा घालायची काय गरज होती. लेडी कॉन्स्टेबल आहे, तिने जपून राहावे ना!, ती माझ्यावर खोटे आरोप करत होती. मला न्याय मिळाला.’
बीबीसी उर्दूला दिलेल्या प्रतिक्रियेत फैजा म्हणते, ‘त्याने मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. लांच्छनास्पद आरोप करत चारित्र्यावर शिंतोडे उडवले. न्याय मिळवून देणारा असा असतो का?’
भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून तिने घटनेच्या दुसर्‍या  दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, तिचे सहकारी बदनामीच्या भीतीपोटी फैजा कामावर असल्याचे सांगत आहेत. याउलट, पंजाबमधील बहुतेक जनता फैजाच्या समर्थनात उतरली आहे. फैजा नवाजवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात फेसबुक लाइव्ह करून ते बोलत आहेत. अनेकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. जिथे महिला पोलिसांना बेदम मारलं जातं, तिथे जनतेची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
त्या व्हायरल फोटोतही त्या विकृताचा पुरुषी अहंकार ठळक जाणवतो. हातात बेडय़ा टाकल्याचा राग हा व्यक्तिगत आकस होत, सूडबुद्धीत परावर्तित झाला. या पुरुषी अहंकारानेच फैजा नवाजला लढण्याची ऊर्मी दिलेली आहे. 

 

Web Title: Pakistani woman police officer slapped by lawyer demands justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.