आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:15 IST2025-08-02T21:13:44+5:302025-08-02T21:15:26+5:30
Saina Nehwal Patch up with Parupalli Kashyap after Divorce Announcement: १३ जुलैला सोशल मीडियावर केली होती वेगळं होण्याची घोषणा

आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
Saina Nehwal Patch up with Parupalli Kashyap after Divorce Announcement: स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने २० दिवसांपूर्वी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट दिली होती. सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी घटस्फोट घेतल्याची ती बातमी होती. पण आता सायनाने एक आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सायनाने जाहीर केले आहे की, ती आणि पारूपल्ली कश्यप दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. अवघ्या २० दिवसांतच या जोडप्याने त्यांचा घटस्फोटाचा विचार बदलून पुन्हा एकदा प्रयत्न नाते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
सायनाने सोशल मीडिया स्टोरीद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक सेलिब्रिटी जोडपी लग्नानंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी वेगळी होताना दिसत आहेत. अशातच सायना आणि पारुपल्ली कश्यप यांनी पॅच-अपचा निर्णय घेतला असल्याने साऱ्यांना आनंद झाला आहे. हे दोघे लग्नाआधी दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. पण ७ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. पण आता मात्र ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
तेव्हा सायना काय म्हणाली होती?
सायनाने रविवारी (१३ जुलै) रात्री उशिरा इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून ही घोषणा केली होती. सायनाने पोस्टमध्ये म्हटले होते, "आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत." सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला होता. सायनाने लिहिले होते, "या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. अशा वेळी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयता समजून घेतल्याबद्दल आणि त्याचा आदर केल्याबद्दल सर्वांचे आभार."
२०१८ मध्ये प्रेमविवाह
सायना आणि पारूपल्ली कश्यप यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. असे म्हटले जाते की त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती. तिथेच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.