Saina Nehwal Divorce : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक निर्णयाची घोषणा केली. सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी तिने दिली. सायनाने सोशल मीडिया स्टोरीद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना धक्का दिला. सायना आणि भारताचा माजी नंबर-१ पुरुष बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप हे दोघे दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. पण आता ७ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला आहे. मात्र त्यांच्या वेगळे होण्याचे खरे कारण अद्याप कळलेले नाही.
दोघांनी विचार करून घेतलेला निर्णय
सायनाने रविवारी (१३ जुलै) रात्री उशिरा इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून ही घोषणा केली. सायनाने पोस्टमध्ये म्हटले आहे, "आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत." सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला. सायनाने लिहिले की, "या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. अशा वेळी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयता समजून घेतल्याबद्दल आणि त्याचा आदर केल्याबद्दल सर्वांचे आभार."
२०१८ मध्ये झाला होता प्रेमविवाह
सायना आणि पारूपल्ली कश्यप यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. असे म्हटले जाते की त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती. तिथेच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.