ईडन गार्डनवर पावसाची सरशी

By Admin | Updated: April 27, 2015 01:50 IST2015-04-27T01:50:31+5:302015-04-27T01:50:31+5:30

आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा

Rainy rains at Eden Gardens | ईडन गार्डनवर पावसाची सरशी

ईडन गार्डनवर पावसाची सरशी

कोलकाता : आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत एकही चेंडू टाकला गेला नाही.
ही लढत सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होणार होती, पण त्यापूर्वीच कोलकातामध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे बाह्ण मैदान निसरडे झाले. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. ही लढत रद्द झाल्यामुळे उभय संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. राजस्थानच्या खात्यावर एकूण ११ गुणांची नोंद असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर सात गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
पावसाला प्रारंभ झाल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी पूर्ण मैदानावर कव्हर टाकले, पण मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणी साचले व बाह्य मैदान निसरडे झाले. येथे शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली होती, पण सामना प्रारंभ होण्यापूर्वी येथे पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी दोन सुपर सोपर्सचा वापर करण्यात आला आणि अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यात यश आले नाही. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर डग आऊटमध्ये बसून परिस्थिती जाणून घेत होता. मैदानावरील कर्मचाऱ्यांची धावपळ बघितल्यानंतर काही षटकांचा सामना आयोजित होण्याची शक्यता वर्तवली जात होती
पावसानंतर एकवेळ सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. डेव्हिड लॉयड यांनी सांगितले की, ‘५.३० नंतर काही षटके कमी केल्या जारू शकतात.’ ५ वाजताच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कव्हर काढण्यास सुरुवात झाली, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केली.
पंचांनी राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी उप्टन यांच्यासोबत सामन्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली. या व्यतिरिक्त गंभीरने केकेआरचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर व मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर व राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले. एकही चेंडू न टाकताच सामना रद्द करण्यात आला. रद्द सामन्यानंतर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. आयपीएलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rainy rains at Eden Gardens