जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. नुकतेच भारताकडून पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शदचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. अर्शदचे इन्स्टाग्राम अकाउंट भारतात उपलब्ध नसेल. याशिवाय, अली जफर, हानिया आमिर आणि माहिरा खान यांसारख्या प्रसिद्ध लोकांचे इंस्टाग्राम प्रोफाइल देखील भारतात ब्लॉक करण्यात आले. भारताची डिजिटल सुरक्षा राखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले.
या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली. यादीत पाकिस्तानी क्रिकेटपटूं शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी कर्णधार बासित अली, रशीद लतीफ, तनवीर अहमद यांच्यासह दोन युट्यूबर्सच्या चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेलवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध भडकाऊ, सांप्रदायिक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक पर्यटक होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक कठोर पावले उचलली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले.