Kabaddi: Sharadashram children's team became champion | कबड्डी : शारदाश्रम मुलांच्या संघाला विजेतेपद

कबड्डी : शारदाश्रम मुलांच्या संघाला विजेतेपद

मुंबई :  शारदाश्रम मुलांच्या (दादर) संघाने अत्यंत अटीतटीच्या अंतिम लढतीत अंतोनियो डिसुझा हायस्कूल भायखळा संघावर केवळ एका गुणाने सनसनाटी मात करून आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्टस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शारदाश्रम संघाने ही लढत ८०-७९ अशी जिंकली. पूर्वार्धात त्यांनी ४२-३८ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. शेवटच्या पांच मिनिटात शारदाश्रमकडे ५ गुणांची आघाडी होती मात्र अंतोनियो डिसुझा शाळेचा स्टार खेळाडू प्रथम लाथ याने प्रत्येक चढाईत बोनस आणि गुण घेत शेवटच्या क्षणी आपल्या संघाला ६९-६९ अशी बरोबरी साधून दिली. मात्र शेवटच्या चढाईत शारदाश्रम संघाच्या खेळाडूने खोलवर चढाई करून बोनस गुण वसूल करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शारदाश्रमच्या दत्तगुरू नेरुरकरची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चढाईसाठी प्रथम लाथ आणि मयुरेश सापते यांना तर उत्कृष्ट पकडीसाठी सोहम हातणकर आणि रोहन शिंदे यांना गौरविण्यात आले. हशू अडवाणी (गोवंडी) शाळेने शारदाश्रम टेक्निकल शाळेला हरवून तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या संघाना आत्माराम मोरे प्रतिष्ठानच्या वतीने ट्रॉफी, टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. निरंजन डावखरे, एम.एल.सी., यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनिकुमार मोरे, कृतार्थ राजा, संचालक, ए.आय.सी., नगरसेवक महादेव शिवगण, अमरहिंद मंडळाचे सचिव दीपक पडते, कबड्डी संघटक मीनानाथ धानजी, लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Kabaddi: Sharadashram children's team became champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.