भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:53 IST2025-11-26T18:52:49+5:302025-11-26T18:53:16+5:30
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीच्या बैठकीत भारताच्या या बोलीला औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली. याआधी भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.

भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताला पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे. २०३० मध्ये होणाऱ्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद शहरात आयोजित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीच्या बैठकीत भारताच्या या बोलीला औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली. याआधी भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.
२०३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत (पहिली स्पर्धा १९३० मध्ये हॅमिल्टन, कॅनडा येथे झाली होती). हा शताब्दी सोहळा 'युवा, महत्त्वाकांक्षा आणि समृद्ध संस्कृती' असलेल्या भारतात आयोजित करण्याची इच्छा कॉमनवेल्थ स्पोर्टने व्यक्त केली होती. अहमदाबाद शहराची निवड तांत्रिक अंमलबजावणी, खेळाडूंचा अनुभव, पायाभूत सुविधा आणि प्रशासन यासह विविध निकषांवर मूल्यांकन करून करण्यात आली आहे.
२०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे यशस्वी आयोजन हे २०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षी बोलीला मोठे बळ देणार आहे. ज्यासाठी देखील अहमदाबाद शहर प्रमुख यजमान शहर म्हणून प्रस्तावित आहे. यजमानपदाच्या शर्यतीत भारताला नायजेरियातील अबुजा शहराकडून आव्हान होते. परंतु कॉमनवेल्थ स्पोर्टने भविष्यातील स्पर्धांसाठी आफ्रिकेला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. या घोषणेनंतर ग्लासगो येथील बैठकीत गुजरातमधील गरबा नृत्याचे सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले.