तेजस्विन, जामजंग यांचा गोल्डन स्टार्ट

By Admin | Updated: September 8, 2015 04:29 IST2015-09-08T04:29:19+5:302015-09-08T04:29:19+5:30

अ‍ॅथलेटिक तेजस्विन शंकर आणि वेटलिफ्टर जामजंग देऊ यांनी आपापल्या प्रकारात सुवर्ण कामगिरी करून पाचव्या युवा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला गोल्डन सुरुवात

Golden Start of Tejaswini, Jamjang | तेजस्विन, जामजंग यांचा गोल्डन स्टार्ट

तेजस्विन, जामजंग यांचा गोल्डन स्टार्ट

आपिया : अ‍ॅथलेटिक तेजस्विन शंकर आणि वेटलिफ्टर जामजंग देऊ यांनी आपापल्या प्रकारात सुवर्ण कामगिरी करून पाचव्या युवा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला गोल्डन सुरुवात करून दिली. याच वेळी जलतरणमध्ये सुप्रिय मोंडलने रौप्यपदक जिंकल्याने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने एकूण तीन पदकांची कमाई करून आपली छाप पाडली.
प्रशांत महासागरातील समोआ देशामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने चमक दाखवून गुणतालिकेमध्ये दक्षिण आफ्रिका, आॅस्टे्रलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यानंतर पाचव्या स्थानी झेप घेतली. दिल्लीच्या १७ वर्षीय शंकरने उंच उडी प्रकारामध्ये विक्रमी झेप घेताना २.१४ मीटरची उडी घेतली.
या कामगिरीसह त्याने सुवर्ण जिंकतानाच भारताचाच हरिशंकर राय याने २००४मध्ये आॅस्टे्रलियामध्ये रचलेला २.१३ मीटरचा विक्रम मोडला. त्याचबरोबर शंकरने या कामगिरीसह आपल्या वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरीची बरोबरीदेखील केली. गत महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर फेडरेशन कप स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली होती. उंच उडीमध्ये श्रीलंकेचा रोशन रणतुंगा आणि जमैकाचा लाशेन विल्सन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी २.११ मीटरची झेप घेतली.
तत्पूर्वी, १७ वर्षीय जामजंगने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकताना भारताच्या पदकांचा श्रीगणेशा केला होता. त्याने ५६ किलोगटातून सर्वाधिक एकूण २३७ किलोंचे वजन उचलून एकहाती वर्चस्व राखले. स्नॅचमध्ये १०२ किलो, तर त्यानंतर क्लीन आणि जर्कमध्ये १३५ किलो वजन उचलताना सुवर्णपदक निश्चित केले.
या दोघांच्या धडाक्यानंतर जलतरणपटू सुप्रियने भारताला चंदेरी यश मिळवून दिले. त्याने मुलांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १.९४ सेकंदांत शर्यत पूर्ण करताना रौप्यपदकावर कब्जा केला. न्यूजीलंडच्या विलरीच कोएटजीने (१.८५) सहज वर्चस्व राखताना सुवर्ण जिंकले. तर, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेंडन लेवीने कांस्यपदक पटकावले. एकूण ९ खेळांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताच्या २५ खेळाडूंनी ८ खेळांमध्ये सहभाग घेतला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Golden Start of Tejaswini, Jamjang