युरो कप : इंग्लंडचा वेल्सला दणका

By Admin | Updated: June 16, 2016 21:38 IST2016-06-16T21:38:21+5:302016-06-16T21:38:21+5:30

पहिल्याच मिनिटामध्ये डॅनियल स्टरीज याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘बॅटल आॅफ ब्रिटन क्लॅश’ सामन्यात वेल्स संघाला २-१ असे पराभूत केले

Euro Cup: England's Wells Danger | युरो कप : इंग्लंडचा वेल्सला दणका

युरो कप : इंग्लंडचा वेल्सला दणका

ऑनलाइन लोकमत
लेन्स, दि. 16 - अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटामध्ये डॅनियल स्टरीज याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘बॅटल आॅफ ब्रिटन क्लॅश’ सामन्यात वेल्स संघाला २-१ असे पराभूत केले.
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मध्यंतराच्या काही मिनिटांअगोदर मिळालेली फ्री किक सत्कारणी लावताना गॅरेथ बेल याने ४२व्या मिनिटाला वेल्सला आश्चर्यकारकरीत्या १-० असे आघाडीवर नेले. यानंतर वेल्सने भक्कम बचाव करताना मध्यंतराला १-० असे वर्चस्व राखले.
मध्यंतरानंतर मात्र इंग्लंडने अपेक्षेनुसार आक्रमक खेळ करताना वेल्सला गाठण्याच्या प्रयत्न केला. सुरुवातीला स्टार वेन रुनी गोल करण्यात सातत्याने अपयशी ठरल्यानंतर त्याने बचावात्मक भूमिका घेत संघाचा बचाव भक्कम करण्यावर अधिक भर दिला. यावेळी इंग्लंडने बदली खेळाडू म्हणून जेमी वर्डी आणि स्टरीज यांना मैदानात उतरवले. या दोघांनी निर्णायक आक्रमक खेळ करताना आपल्या प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरवला.
मध्यंतरानंतर लगेच या दोघांनीही वेल्सच्या गोलजाळ्यावर हल्ला करताना आपला इरादा स्पष्ट केला. ५६व्या मिनिटाला इंग्लंडने वेल्सच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आणि यावेळी वर्डीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना महत्त्वपूर्ण गोल करुन संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडने अधिक आक्रमक खेळ करताना वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेल्सच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
निर्धारीत वेळेतही बरोबरी कायम राहिल्यानंतर ३ मिनिटांचा अतिरीक्त वेळ देण्यात आला. यावेळी पहिल्याच मिनिटामध्ये स्टरीजने डेले अलीच्या पासवर निर्णायक गोल करताना इंग्लंडला २-१ असे आघाडीवर नेत वेल्सच्या आव्हानातली हवा काढली. यानंतर हीच आघाडी कायम राखून इंग्लंडने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Euro Cup: England's Wells Danger