दक्षिण कोरियामध्ये तिरंगा फडकला, आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:34 IST2025-05-28T20:33:42+5:302025-05-28T20:34:44+5:30

Asian Athletics Championships 2025: आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले.

Asian Athletics Championships: India Win Gold In Mixed Relay | दक्षिण कोरियामध्ये तिरंगा फडकला, आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक!

दक्षिण कोरियामध्ये तिरंगा फडकला, आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक!

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून इतिहास रचला. या स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाने ४x४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय रिले संघाने जबरदस्त समन्वय आणि वेग दाखवत ३:१८.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली. 

भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी उत्तम कामगिरी केली. चारही धावपटूंनी उत्तम टीमवर्क दाखवले आणि सुरुवातीपासूनच भारताला शर्यतीत आघाडीवर ठेवले, ज्यामुळे निकाल भारताच्या बाजूने लागला.  भारताने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. याआधीही भारताने या खेळात सुवर्णपदक जिंकले.

शर्यत संतोष कुमारने सुरू केली. त्याने जलद सुरुवात केली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने रुपल चौधरीकडे बॅटन सोपवले, त्याला चिनी खेळाडूने चांगलीच टक्कर दिली. पंरतु, रुपल वेग कायम ठेवला आणि विशाल टीकेकडे बॅटन दिला. विशालने सुरुवात धीमी केली. पण नंतर त्याने वेग वाढवून भारताला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या टप्प्यात धावणाऱ्या सुभा वेंकटेशनने जबरदस्त संतुलन आणि वेग दाखवला आणि सुवर्णपदक भारताच्या खिशात घातले. 

भारतीय संघाने ही शर्यत ३:१८.१२ सेकंदात पूर्ण केली, ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या शर्यतीत चीन दुसऱ्या स्थानावर राहिला. चीनने ३:२०.५२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक जिंकले. श्रीलंका या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला. श्रीलंकेने ३:२१.९५ सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्य पदक जिंकले.

या विजयासह भारताने ४×४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत आपले तिसरे पदक जिंकले. २०१९ मध्ये प्रथमच भारताचा चॅम्पियनशिपमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी भारताने रौप्य पदक जिंकले. २०२३ मध्ये भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर आता भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.

Web Title: Asian Athletics Championships: India Win Gold In Mixed Relay