अखेरच्या दिवशी आनंदचे वर्चस्व; पण पोडीयमपासून दूरच

By Admin | Updated: October 13, 2015 23:56 IST2015-10-13T23:56:38+5:302015-10-13T23:56:38+5:30

माजी विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या दिवशी ५ फेऱ्यांमध्ये ४ गुणांची कमाई केली; पण पहिल्या दोन दिवसांतील निराशाजनक कामगिरीमुळे या भारतीय

Anand's dominance over the last day; But far from Podium | अखेरच्या दिवशी आनंदचे वर्चस्व; पण पोडीयमपासून दूरच

अखेरच्या दिवशी आनंदचे वर्चस्व; पण पोडीयमपासून दूरच

बर्लिन : माजी विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या दिवशी ५ फेऱ्यांमध्ये ४ गुणांची कमाई केली; पण पहिल्या दोन दिवसांतील निराशाजनक कामगिरीमुळे या भारतीय स्टार बुद्धिबळपटूला स्पर्धेत २५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या तीन दिवसीय स्पर्धेत मॅग्नस कार्लसन आपले जेतेपद राखण्यात यशस्वी ठरला. नॉर्वेच्या या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. १५ फेऱ्यांपैकी केवळ एका फेरीत हा खेळाडू अडचणीत असल्याचे दिसून आले. त्याने ८ विजय व ७ अनिर्णीत निकालांसह एकूण ११.५ गुणांची कमाई केली.
रशियाचा इयान नोपोमनियाचतची, अझरबेझानचा तैमूर रादजाबोव आणि क्युबाचा लिनियर डोमिनगेज अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानी राहिले. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १०.५ गुणांची नोंद होती. आनंदच्या खात्यावर ९.५ गुण होते. पहिल्या दोन दिवसांत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या दिवशी २.५, तर दुसऱ्या दिवशी ३ गुण मिळविले.
पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या आनंदने अखेरच्या दिवशी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. त्याने पोलंडचा ग्रँडमास्टर बार्तोस सोको आणि मातेस बार्तल त्याचप्रमाणे अर्मेनियाचा तिगरामन पेट्रोसियान यांचा पराभव केला, तर रशियाचा इलदार खैरुलिन व युक्रेनचा युरी क्रिवारुचको यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या.
भारताच्या विदित संतोष गुजराथीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने रॅपिड रेटिंगमध्ये १०५ गुण मिळविले. त्याने या स्पर्धेत ९ गुण मिळविले असून, तो आनंदपेक्षा एका स्थानाने पिछाडीवर आहे. विदितने अखेरच्या दिवशी आघाडीचा बुद्धिबळपटू लेव्होन आरोनियनला बरोबरीत रोखले. बी. अधिबानने छाप पाडताना ९ गुणांची कमाई केली.



त्याने दुसऱ्या दिवशी रशियाच्या दिमित्र आंद्रेकिनचा पराभव केला, तर अखेरच्या दिवशी विश्व चॅम्पियन व माजी चॅलेंजर बॉरिस गेलफंडला बरोबरीत रोखले.
अन्य भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये शशिकिरण (८ गुण), एस.पी. सेतुरामन (७.५ गुण) आणि सूर्यशेखर गांगुली (७ गुण) यांनीही चांगली कामगिरी केली.
आता विश्व ब्लिट््झ चॅम्पियनशिप खेळल्या जाणार असून, या ५ दिवसीय स्पर्धेत सर्व स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. पोकर्स स्टार्स बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावल्यामुळे ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्ण या २१ फेऱ्यांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)
०००

Web Title: Anand's dominance over the last day; But far from Podium