DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 19:33 IST2024-08-09T19:10:55+5:302024-08-09T19:33:04+5:30
team india hockey : भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली.

DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव
Paris Olympics 2024 : भारताच्याहॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकले. भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकताच हॉकीच्या महासंघाने प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. याशिवाय सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ७.५ लाख रूपये मिळतील. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक ठरले.
टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस जाहीर करताना महासंघाने सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ७.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. याची माहिती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. याशिवाय पंजाब सरकार आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही बक्षिसे जाहीर केली आहेत.
खेळाडूंवर पैशांचा वर्षाव
मूळचा मध्य प्रदेशातील असलेल्या विवेक सागरचा उल्लेख मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलीस उपअधीक्षक (DSP) असा केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी विवेक सागरशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विवेक सागर याचे अभिनंदन करताना सांगितले की, तू मध्य प्रदेशला गौरव मिळवून दिला आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे. विवेक सागर आमचा डीएसपी आहे, असे मोहन यादव यांनी आवर्जुन सांगितले. तसेच सरकारकडून त्याला कोट्यवधी रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर पंजाब सरकारने देखील खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, कांस्य पदक विजेत्या हॉकी संघातील सर्व खेळाडूंना पंजाब सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.