स्वस्तात अमेरिकन डॉलरचा मोह पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 06:13 IST2025-10-30T06:12:57+5:302025-10-30T06:13:57+5:30
नवी मुंबई पोलिसांनी मुंब्र्यातील अशा टोळीचा भंडाफोड केला आहे.

स्वस्तात अमेरिकन डॉलरचा मोह पडेल महागात!
नवी मुंबई: झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात अनेक जण वेगवेगळे मार्ग पत्करतात. त्यात स्वस्तात मिळणारे अमेरिकन डॉलर खरेदी करून एकाचे दोन लाख करू पाहणारेही अनेक आहेत. मात्र, हा मोह अनेकांच्या अंगलट आला असून, त्यात काहींचे लाखो रुपये लुटले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईपोलिसांनी मुंब्र्यातील अशा टोळीचा भंडाफोड केला आहे.
भाजी, आंबे विक्रेते किंवा इतर कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून व्यापारी आणि बऱ्यापैकी पैसे असलेल्या व्यक्तींसोबत ओळख वाढवायची. यानंतर त्यांना आपल्याकडे अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून त्यांना ते खरेदी करण्यासाठी भाग पाडायचे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून ठरलेल्या भावाप्रमाणे लाख - दोन लाख रुपये घेतल्यानंतर हाती कागदी बंडल टेकवून धूम ठोकायची, अशी या गुन्हेगारांची पद्धत. कांदिवली येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाची अशाच प्रकारातून तीन लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांना डॉलर घेण्यासाठी घणसोलीत बोलावण्यात आले होते. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रबाळे पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. घटनास्थळी येण्याचा, जाण्याचा मार्ग व लपण्याचे ठिकाण सतत बदलून ते पोलिसांना गुंगारा देत होते. त्यानंतरही पोलिसांनी हात न टेकता मुंब्रा परिसरात त्यांच्यावर पाळत ठेवून सहा जणांना अटक केली.
असे टिपायचे सावज...
अटक सहा आरोपींनी नवी मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये अनेक गुन्हे केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे मुंबईसह लगतच्या शहरात वावरून ते सहज भुलतील अशा व्यक्तींना गळाला लावण्यासाठी ते कित्येक दिवस, महिने व्यक्तीसोबत ओळख वाढवण्यासाठी घालवायचे.