रस्ते दुरुस्तीच्या नावाने धूळफेक; महापालिकेचे तीन कोटी गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:53 AM2019-11-21T00:53:04+5:302019-11-21T00:53:06+5:30

अधिकारी व कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी

Dust in the name of road repairs; Three crores of municipal corporation went into the pit | रस्ते दुरुस्तीच्या नावाने धूळफेक; महापालिकेचे तीन कोटी गेले खड्ड्यात

रस्ते दुरुस्तीच्या नावाने धूळफेक; महापालिकेचे तीन कोटी गेले खड्ड्यात

googlenewsNext

नवी मुंबई : रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली महापालिकेने कंत्राटदारांवर जवळपास तीन कोटी रुपयांची खैरात वाटली आहे; परंतु पावसाळा उलटून गेला तरी रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली धूळफेक करण्यात आली आहे. माती आणि डेब्रिजचा भराव टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी डांबराचा थर टाकून रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली आहे. एकूणच खड्डे बुजविण्याच्या आडून महापालिकेने कंत्राटदारांवर दाखविलेली मेहरनजर संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर फक्त ३८८७ खड्डे असल्याचा जावईशोध महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सप्टेंबर महिन्यात लावला होता. त्यानुसार हे खड्डे बुजविण्यासाठी चक्क दोन कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला होता. संपूर्ण खड्डे बुजविल्याची खात्री करून कामाचा दर्जा पाहूनच संबंधित कंत्राटदाराला बिल दिले जाईल, असे महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार परतीच्या पावसाने विश्रांती घेताच संबंधित ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, या कामात कोणतीही सुसूत्रता नसल्याचे दिसून आले. महत्त्वाच्या व दर्शनी भागातील खड्डे बुजविण्यावर भर दिला गेला. मात्र, वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यांकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून आजही शहरातील अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे दिसून येतात. हे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरले आहेत. शिवाय वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी नक्की काय काम केले. त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा कसा आहे, याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज असल्याची रहिवाशांची मागणी आहे.

महिनाभरापूर्वी डांबराचा थर टाकून बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. खड्ड्यात टाकण्यात आलेले डेब्रिज, मुरूम आणि मातीचा भराव बाहेर पडला आहे. अनेक भागातील रस्त्यांकडे हे कंत्राटदार फिरकलेच नाहीत. एपीएमसीकडे जाणारा कोपरी उड्डाणपुलाखाली रस्ता पूर्णत: उखडला आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. मध्यंतरीच्या काळात एक-दोन वेळा माती आणि डेब्रिज टाकून हे खड्डे बुजविण्याचा दिखावा करण्यात आला. आता तर या रस्त्यावरून चालणेही अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे, कोपरखैरणे आणि बोनकोडे येथून एपीएमसी किंवा तुर्भेकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आणि जवळचा आहे. त्यामुळे या मार्गावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर दिवाबत्ती नसल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत होत आहे. कोपरीतील या रस्त्यांप्रमाणेच शहरातील अनेक रस्त्यांची कमी-अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली तीन कोटी रुपयांची उधळण करणारे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद
खड्ड्यांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. शिरवणे, तुर्भे, महापे, पावणे ते दिघापर्यंतच्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रत्येक नोडमधील रस्त्यांची अवस्था अशीच असल्याने शहरवासीयांत प्रशासनाच्या विरोधात नाराजीचे सूर पसरले आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत रस्त्यांच्या दुरवस्थेचे तीव्र पडसाद उमटले होते. खड्डे बुजविण्याच्या कामात घोटाळा होत असल्याचा आरोप त्या वेळी स्थायी समिती सदस्यांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने शहरात एकूण ३८८७ खड्डे असल्याचे जाहीर करून त्यापैकी ३०४५ खड्डे बुजविण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यासाठी तब्बल दोन कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. मागील दोन महिन्यांत यापैकी किती खड्डे बुजविले, त्यासाठी कंत्राटदारांना किती पैसे दिले, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी आता रहिवाशांकडून केली जात आहे.

Web Title: Dust in the name of road repairs; Three crores of municipal corporation went into the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.