Corona Vaccination In Maharashtra : लसच उपलब्ध नाही; पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 09:23 PM2021-04-07T21:23:47+5:302021-04-07T21:24:25+5:30

Corona Vaccination In Maharashtra : महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

CoronaVaccination In Maharashtra No vaccine available Covid vaccination stopped in Panvel Municipal Corporation | Corona Vaccination In Maharashtra : लसच उपलब्ध नाही; पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण बंद

Corona Vaccination In Maharashtra : लसच उपलब्ध नाही; पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण बंद

Next

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला. "राज्यात आज काही ठिकाणी लस उपलब्ध नाही म्हणून नाईलाजानं लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही दिली आहे. याच दरम्यान आता पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण बंद करण्यात आले आहे. 

कोरोना लसच उपलब्ध नसल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. "पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र लशींच्या तुटवडा असल्याकारणामुळे पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय व खासगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहील याची नोंद घ्यावी" अशी माहिती पनवेल महापालिकेने दिली आहे. केंद्राकडून लशीचा पुरवठा सुरू आहे पण त्यात गती नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आठवड्याला 40 लाख डोस हवेत

देशात लसीकरणाच्याबाबतीत महाराष्ट्र नंबर एकचं राज्य ठरत आहे. त्यामुळे राज्याची गरज लक्षात घेता केंद्रानं महाराष्ट्राला दरआठवड्याला कोरोना लशीचे 40 लाख डोस पुरवावेत अशी मागणी टोपे यांनी केली आहे. राज्यात लसीकरण वेगानं होतंय आणि यापुढील काळात याचा वेग आणखी वाढवला जाईल. पण त्याच तुलनेत लशीचा पुरवाठा देखील राज्याला व्हायला हवा, असं टोपे म्हणाले. 

राज्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच साठा

राज्यात 14 लाख इतकाच लशीचा साठा शिल्लक असून तो तीन दिवसांत संपेल. त्यामुळे केंद्रानं याची नोंद घेऊन मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर लस राज्यांना द्यायला हवी. केंद्र सरकार लशीचा पुरवठा करत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण होणारा पुरवठा आणखी वेगानं व्हायला हवा, असं राजेश टोपे म्हणाले. 

CoronaVirus Live Updates : "महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाच्या प्रयत्नांचं चाक रुतलं"

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. तसेच "महाराष्ट्राच्या सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाच्या प्रयत्नांचं चाक रुतलं. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून मी गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारचा सावळागोंधळ आणि बेजबाबदारपणा पाहतोय. लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे, त्यात अजिबात तथ्य नाही!" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: CoronaVaccination In Maharashtra No vaccine available Covid vaccination stopped in Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.