"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:05 IST2025-09-06T11:55:28+5:302025-09-06T12:05:35+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला नोएडा पोलिसांनीअटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असून, तो मूळचा बिहारचा आहे आणि नोएडाच्या सेक्टर-११३ भागात गेल्या पाच वर्षांपासून राहत होता. मुंबईपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमकी काय होती धमकी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विनीने व्हॉट्सॲप संदेशाद्वारे मुंबई पोलिसांना धमकी दिली होती. 'लष्कर-ए-जिहादी' या दहशतवादी संघटनेचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले असून, ते ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स वापरून मोठा स्फोट घडवणार आहेत. या स्फोटात एक कोटी लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याचे त्याने या संदेशात म्हटले होते. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
नोएडा पोलिसांनी केली तात्काळ कारवाई
मुंबई पोलिसांकडून माहिती मिळताच, नोएडा पोलिसांचे सीपी लक्ष्मी सिंह यांच्या निर्देशानुसार पोलीस आणि स्वाट (SWAT) टीमने तात्काळ कारवाई केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे (technical analysis), पोलिसांनी आरोपी अश्विनीला त्याच्या ठिकाणावरून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाइल फोनही जप्त केला आहे.
आता मुंबई पोलीस आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करत आहेत. हा आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे की तो एखाद्या मोठ्या षड्यंत्रात सामील आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. गणेशोत्सव सुरू असताना अशा धमक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हा धोका टळला. यामुळे, नोएडा पोलीस आणि मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.