कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 07:17 PM2019-11-18T19:17:16+5:302019-11-18T19:31:06+5:30

'सत्तास्थापनेबाबत चर्चाच नाही'

Who are Navneet Kaur Rana?- Sharad Pawar | कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीत उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली. 


दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे विधान केले आहे. शरद पवारांनी देशाचे नेतृत्व केले आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे. 

(सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर')

याचबरोबर, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांनी सरकार स्थापन करायला हवे होते. शिवसेना-भाजपा महायुतीला कौल दिला आहे. मात्र राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. निम्म्या जागा असताना मुख्यमंत्रिपद मागणे चुकीचे आहे. त्यांच्या मुळेच राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, अशा शब्दात नवनीत कौर राणा यांनी शिवेनेवर हल्लाबोल केला.

आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेल
बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले. 


सभागृहाची प्रतिमा जपायला हवी 
राज्यसभेच्या महत्वाची बाब म्हणून संसदेत चर्चा झाली. सभागृहाची प्रतिमा जपण्यावर भाष्य झालं. त्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. मी इतकी वर्ष विधानसभा, राज्यसभा, लोकसभा पाहिली. पण विरोध करण्यासाठी मी कधी वेलमध्ये आलो नाही. सभागृहाची प्रतिमा जपायला हवी असं मत पवारांनी मांडलं.  

नवनीत राणा कौर यांना आघाडीचे समर्थन
लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाच्या निडणुकीत नवनीत राणा कौर यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समर्थन दिले होते. यासाठी नवनीत राणा कौर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या निवडणुकीत नवनीत राणा कौर यांनी युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

Web Title: Who are Navneet Kaur Rana?- Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.