Maharashtra Election, Maharashtra Government: There is no talk with Sonia Gandhi about power crisis in Maharashtra Says Sharad Pawar | ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'

ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असं सांगत शरद पवारांनी शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अहमद पटेलदेखील उपस्थित होते. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. याबाबत पक्षातील नेत्यांची मतं जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत. तुम्ही त्यांनाच विचारा हा आकडा कुठून आला? किमान समान कार्यक्रम ठरविण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही असं सांगत राज्यातील सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेल
बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले. 

सभागृहाची प्रतिमा जपायला हवी 
राज्यसभेच्या महत्वाची बाब म्हणून संसदेत चर्चा झाली. सभागृहाची प्रतिमा जपण्यावर भाष्य झालं. त्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. मी इतकी वर्ष विधानसभा, राज्यसभा, लोकसभा पाहिली. पण विरोध करण्यासाठी मी कधी वेलमध्ये आलो नाही. सभागृहाची प्रतिमा जपायला हवी असं मत पवारांनी मांडलं.  
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: There is no talk with Sonia Gandhi about power crisis in Maharashtra Says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.