"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:37 IST2025-07-20T12:35:20+5:302025-07-20T12:37:13+5:30
Bihar Election Update: बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच जदयूने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला आहे.

"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
JDU BJP bihar election update: बिहारमध्ये ऐन पावसाळ्यात राजकारणाने वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्ष होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागेल आहेत. पण, जागावाटपाच्या चर्चा सुरू होण्याआधीच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या जदयूने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आहे. पहिल्या श्रेणीत येऊ अथवा तिसऱ्या श्रेणीत, मुख्यमंत्री तर नितीश कुमारच बनणार, असे जदयूच्या नेत्याने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नितीश कुमार यावेळी मुख्यमंत्री बनू शकणार नाही, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात रंगलेली असतानाच जदयूने स्पष्ट भूमिका मांडली आहे. जदयूला कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच बनणार, असा दावा जदयूने केला आहे.
मुख्यमंत्रिपदाबद्दल काय म्हणाला जदयूचा नेता?
बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले जदयूचे वरिष्ठ नेते महेश्वरी हजारी यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल पक्षाची भूमिका मांडली. यापूर्वी अनेक खात्याचे काम पाहिलेले हजारी बिहार विधानसभेचे उपाध्यक्षही राहिलेले आहेत.
हजारी म्हणाले, "जदयू पहिल्या श्रेणी येवो अथवा तिसऱ्या श्रेणीत, (म्हणजे जदयूला जास्त जागा मिळो अथवा कमी) मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील. काहीही करावं लागलं तरी तेच मुख्यमंत्री होतील. याबद्दल कुणाच्याही मनात शंका असता कामा नाही."
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांनीही याबद्दल भूमिका स्पष्ट केली. "बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल, हे निश्चित आहे आणि माझे वडील मुख्यमंत्री बनतील", असे विधान निशांत कुमार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच
बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून एनडीएमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसत आहे. जदयूने आतापासूनच मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्यास सुरूवात केली आहे. जदयू मुख्यालयाच्या बाहेर होर्डिंग लावण्यात आले आहे.
'२५ ते ३०, पुन्हा नितीश', असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे. भाजपचे हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी बिहारच्या निवडणुकीबद्दल एक विधान केले होते. त्यानंतर जदयूने हे होर्डिंग लावत भाजपला मेसेज दिला.
'भाजप बिहार निवडणूक सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिंकेल", असे मुख्यमंत्री सैनी म्हणाले होते. त्याचा अर्थ सम्राट चौधरी हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असा राजकीय वर्तुळात लावला जात. तेव्हापासून जदयू मुख्यमंत्री पदाबद्दल आक्रमक झाली आहे.