जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 23:35 IST2025-11-20T23:34:56+5:302025-11-20T23:35:38+5:30
या दृष्यानंतर, सोशल मीडियावर आदर, राजकीय शिष्टाचार आणि नम्रता यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर नितीश कुमार यांनी गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे हा शपथविधी सोहळा महत्त्वाचा ठरला, या सोहळ्यात NDA ने आपले शक्तिप्रदर्शन केले. शपथविधीनंतर, विमानतळावर मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींचे पदस्पर्श करण्यासाठी वाकले, तो क्षण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
विमानतळावर 'आदराचे' अद्भुत दृश्य -
शपथविधी समारंभानंतर एक मनोरंजक दृश्य बघायला मिळाले. पंतप्रधान मोदी जेव्हा पाटणा विमानतळावर परतले, तेव्हा नितीश कुमार स्वतः त्यांना निरोप देण्यासाठी तिथे पोहोचले. यावेळी, नितीश कुमार पंतप्रधान मोदींना पदस्पर्श करण्यासाठी वाकले, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना तत्काळ असे करण्यापासून रोखले. या दृष्यानंतर, सोशल मीडियावर आदर, राजकीय शिष्टाचार आणि नम्रता यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या पक्षानं शेअर केला व्हिडिओ -
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने नीतीश कुमार आणि पीएम मोदींचा हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल X हैंडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये राजदने लिहिले, "विमानतळावर पंतप्रधान मोदींना पदस्पर्श करून आशीर्वाद घेताना मुख्यमंत्री नितीश कुमार." खरे तर, नितीश कुमार यांनी यापूर्वीही अशा पद्धतीने पंतप्रधान मोदींप्रती आदर व्यक्त केला आहे.
वीडियो में हवाई अड्डे पर प्रधानमंत्री मोदी के पैर छूकर आशीर्वाद प्राप्त करते मुख्यमंत्री नीतीश कुमार! pic.twitter.com/U6wq9qs6iC
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 20, 2025
नव्या सरकारमध्ये 10 नव्या चेहऱ्यांचा समावेश -
नव्या सरकारच्या 26 सदस्यीय मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांसह 10 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात जातीय आणि प्रादेशिक संतुलनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.