तुम्हाला कुणी नग्न फोटो मागितले तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:36 IST2025-10-12T09:36:00+5:302025-10-12T09:36:25+5:30
अक्षय कुमारसारखा लोकप्रिय चेहरा जेव्हा हा विषय उघडपणे बोलतो, तेव्हा समाजाने लाज नव्हे तर सजगता दाखवावी. सेक्सटॉर्शनचा प्रतिकार पोलिसांपेक्षा आधी समाजाने आणि कुटुंबाने करायला हवा.

तुम्हाला कुणी नग्न फोटो मागितले तर?
ॲड. (डॉ.) प्रशांत माळी, सायबर आणि प्रायव्हसी कायदा तज्ज्ञ
अलीकडे अभिनेता अक्षय कुमार यांनी एका मुलाखतीत उघड केले की, एका गेमिंग ॲपवर त्यांच्या मुलीला ‘न्यूड फोटो’ पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. समाजमाध्यमांवर ही बातमी काही काळ ट्रेण्ड झाली; पण काही तासांतच गायबही झाली. कारण, ‘सेक्सटॉर्शन’ हा एक असा सायबर गुन्हा आहे, ज्याबद्दल आपण बोलायलादेखील लाजतो. अक्षय कुमारसारखा लोकप्रिय चेहरा जेव्हा हा विषय उघडपणे बोलतो, तेव्हा समाजाने लाज नव्हे तर सजगता दाखवावी. सेक्सटॉर्शनचा प्रतिकार पोलिसांपेक्षा आधी समाजाने आणि कुटुंबाने करायला हवा.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
‘सेक्स’ आणि ‘एक्सटॉर्शन’ या दोन शब्दांपासून तयार झालेला ‘सेक्सटॉर्शन’ हा गुन्हा म्हणजे लैंगिक स्वरूपाच्या प्रतिमा, व्हिडिओ किंवा चॅट्स वापरून ब्लॅकमेल करणे होय. गुन्हेगार प्रथम विश्वास संपादन करतात. ते गेमिंग ॲप्स, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतात. नंतर फोटो किंवा व्हिडिओ मिळवतात आणि धमकी देतात ‘हे व्हायरल करू, तुझ्या नातेवाइकांना पाठवू.’ काहीवेळा ते परदेशी असतात, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून पैसे मागतात. पीडित व्यक्ती भीतीपोटी गप्प राहते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करते.
तुमची भीती, गुन्हेगारांची शक्ती
भारतीय समाजात लैंगिकता अजूनही झाकली जाते. त्यामुळे सेक्सटॉर्शनचे बळी बहुतेक वेळा तक्रार करायलाच तयार होत नाहीत. मुलं पालकांना सांगत नाहीत, कारण लोक काय म्हणतील? याची त्यांना भीती वाटते.
हीच भीती गुन्हेगारांना हवी असते. म्हणून पालकांनी मुलांशी डिजिटल जगावर मोकळेपणाने चर्चा करावी.
ऑनलाइन कोणाशी बोलायचं?, काय शेअर करायचं नाही? फोटो पाठवण्याची विनंती आली तर काय करायचं? हे सगळं शिकवणं, ही आजची खरी पालकत्वाची जबाबदारी आहे.
सध्याच्या कायद्यानुसार
शिक्षेसाठी काय तरतूद?
भारतात सध्या सेक्सटॉर्शनसाठी स्वतंत्र कलम नाही. अनेक कायद्यांखाली हा गुन्हा गंभीर मानला जातो.
आयटी कायदा २०००च्या कलम ६७ आणि ६७अ नुसार अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाचे साहित्य प्रसारित करणे गुन्हा आहे.
बीएनएस कलम ७८ (पाठलाग करून छळ करणे/त्रास देणे)देखील लागू
होऊ शकते.
जर पीडित अल्पवयीन असेल तर पॉक्सो कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो.
सामाजिक, वैयक्तिक पातळीवरील उपाय
पालक आणि शिक्षकांनी मुलांना डिजिटल मर्यादा शिकवाव्यात.
फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याआधी विचार करा.
ऑनलाइन गेमिंग ॲप्सवरील फ्रेंड रिक्वेस्ट मर्यादित ठेवा.
कठीण प्रसंग आलाच तर लगेच स्क्रीनशॉट
घेऊन सायबर पोलिसांना द्या.
सोशल मीडियावर ब्लॅकमेल करणारे खाते ब्लॉक व
रिपोर्ट करा.