मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग बंद; प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:50 IST2025-05-27T12:48:43+5:302025-05-27T12:50:16+5:30
बेळगाव-गोवा आंतरराज्य रस्ता बंद केल्याने या मार्गावर नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय

मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग बंद; प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील कुसमळीजवळील मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काल रविवार आणि आज सोमवारी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मलप्रभेच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने तात्पुरता पर्यायी पूल धोक्यात आल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी मार्ग बंद केला आहे. या पद्धतीने बेळगाव-गोवा आंतरराज्य रस्ता बंद केल्याने या मार्गावर नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी स्थानिक प्रशासनाने वाहनचालकांना परिस्थिती सुधारेपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून जांबोटी-खानापूर मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रिटिश काळात बांधलेला मलप्रभा नदीवरील मूळ पूल कालांतराने कमकुवत झाला असून वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित मानला जात होता. सुरक्षित संरचनेसाठी वारंवार मागणी केल्यानंतर जानेवारीमध्ये हा पूल पाडण्यात आला आणि त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू झाले. बांधकामादरम्यान संपर्क राखण्यासाठी, बांधकाम सुरू असलेल्या जागेला लागूनच कॉम्पॅक्टेड मातीपासून बनवलेला तात्पुरता पर्यायी पूल बांधण्यात आला आहे.
गेल्या जानेवारीपासून, या तात्पुरत्या हंगामी पुलामुळे बेळगाव आणि गोवा दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू होती. तथापि, गेल्या आठ दिवसांपासून सततच्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. विशेषतः लघु पाटबंधारे विभागाने देवाचीहट्टी, तोरळी आणि आमटे येथील पूल आणि बंधाऱ्यांवरील फळ्या काढून टाकल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तात्पुरत्या पुलाचा काही भाग पाण्याखाली जाऊन तो प्रवासासाठी असुरक्षित बनला आहे. बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद झाल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.