वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:09 IST2025-08-26T18:06:52+5:302025-08-26T18:09:01+5:30

Vaishno Devi Landslide: सुरक्षिततेच्या दृष्टीने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

Vaishno Devi Landslide: Major accident on Vaishno Devi Yatra route; 5 devotees killed, 14 injured due to landslide | वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी

Vaishno Devi Landslide: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज(दि.२६) माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनाची घटना घडली आहे. अर्धकुंवारीजवळ घडलेल्या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कटरा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरू करण्यात आले. मार्गावरील इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. 

भूस्खलनाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ट्रॅकवर मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्याचे दिसत आहे. बचाव पथक दोरी आणि बॅरिकेडिंगच्या मदतीने भाविकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. अर्धकुंभरी ते भवन मार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे.

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

शाळांना सुट्टी जाहीर, परीक्षा पुढे ढकलली
खराब हवामानामुळे विविध सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा २७ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जम्मू आणि काश्मीर शालेय शिक्षण मंडळाने बुधवारी होणाऱ्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद
डोडा येथे ढगफुटीमुळे १० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोर आणि बॅटरी चष्मा येथे टेकड्यांवरून दगड पडल्यानंतर आज सकाळी २५० किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आली. जम्मूमधील उधमपूर आणि काश्मीरमधील काझीगुंड येथील बारमाही महामार्गावरील वाहनांची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. 

२७ ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा
हवामान अंदाजानुसार २७ ऑगस्टपर्यंत जम्मू, सांबा, कठुआ, रियासी, उधमपूर, राजौरी, रामबन, डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उंच भागात ढगफुटी, पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील पाच तास जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

Web Title: Vaishno Devi Landslide: Major accident on Vaishno Devi Yatra route; 5 devotees killed, 14 injured due to landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.