आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:51 IST2025-07-31T20:50:40+5:302025-07-31T20:51:21+5:30
Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरमधील घाटमपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज कुरील यांच्या नावाचा पास लावलेल्या कारने एक ई रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरमधील घाटमपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज कुरील यांच्या नावाचा पास लावलेल्या कारने एक ई रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिलालेल्या अधिक माहितीनुसार कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वार तरुण रेल्वे पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळून गंभीर जखमी झाला. घटनास्थळी धाव घेललेल्या पोलीस आणि इतर लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र सदर रुग्णवाहिका वेळीच न पोहोचल्याने लोकांनी त्याला खाजगी वाहनामधून रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचं नाव आशू गुप्ता असं असून, तो भाजपाच्या एका नेत्याचा भाऊ होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक कार जप्त केली आहे. त्यामधून आमदारांचा पास आणि बियरची रिकामी बाटली जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे कारचालक कार नशा करून चालवत असल्याची शक्यता वर्तली जात आहे. दरम्यान, कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटवली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, या अपघातातील मृत तरुणाच्या भावाने आमदारावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना उन्नावचे पोलीस अधीक्षक दीपक बकर यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले. तरअपघातग्रस्त कार माझा ड्रायव्हर चालवत होता. तर अपघात झाला तेव्हा मी लखनौमध्ये होते, असे आमदार सरोज कुरील यांनी या अपघाताबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.