Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:24 IST2026-01-02T16:23:43+5:302026-01-02T16:24:25+5:30
Uma Bharti : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या अव्यानचा देखील समावेश आहे. तर अनेक लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
उमा भारती यांनी अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत या घटनेला 'कलंक' म्हटलं आहे. उमा भारती यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "अशा पापांचं कोणतेही स्पष्टीकरण नसतं, एकतर प्रायश्चित्त होईल किंवा दंड मिळेल."

"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
"तुमचं काही चालत नव्हतं असं कोण म्हणतंय? जेव्हा जनता घाण पाणी पीत होती, तेव्हा तुम्ही पदावर बसून बिसलेरी का पीत राहिलात? आयुष्याची किंमत २ लाख रुपये नसते. ही मोहन यादव यांची परीक्षेची वेळ आहे. खालपासून वरपर्यंतच्या सर्व गुन्हेगारांना जास्तीत जास्त दंड द्यावा लागेल. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवणाऱ्या शहरात विषारी पाणी मिळणं, हे संपूर्ण व्यवस्थेसाठी लाजिरवाणं आणि अत्यंत कलंकित करणारं" असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेला 'जगण्याच्या अधिकाराची हत्या' म्हटलं आहे. राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहन यादव सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, "इंदूरमध्ये पाणी नाही, तर विष वाटलं गेलं आणि प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत होतं. घराघरात शोककळा पसरली आहे, गरीब हतबल आहेत आणि अशातच भाजपा नेत्यांची अहंकारी विधानं येत आहेत. ज्यांच्या घरात दु:ख आहे, त्यांना सांत्वन हवं होतं, मात्र सरकारने त्यांना अहंकार दिला."