दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:25 IST2025-08-18T10:19:17+5:302025-08-18T10:25:54+5:30

Nagpur Crime News: गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

Truck driver ran away after hitting a bike, police caught him with the help of AI | दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नागपूरमधील एका हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनी एआयच्या मदतीने आरोपी ट्रकचालकाला पकडले आहे. पोलिसांनी एआयच्या मदतीने दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकची ओळख पटवली. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार नागपूरमध्ये रक्षा बंधनादिवशी ९ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली होती. त्यात महिलेचा मृत्यू झाला होता. तर पती जखमी झाला होता. त्यानंतर कुणी मदतीस न आल्याने पती तिचा मृतदेह दुचाकीला बांधून नेत असल्याचं हृदयद्रावक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केल्यावर या पतीने धडक देणाऱ्या ट्रकवर लाल खुणा होत्या असे सांगितले. मात्र सदर ट्रक किती मोठा होता आणि कोणत्या कंपनीचा होता, हे तो सांगू शकला नाही.

त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रिकपण गोळा केले. हे चित्रिकरण वेगवेगळ्या टोल नाक्यांवरून गोळा करण्यात आलं होतं. हे सर्व सीसीटीव्ही एकमेकांपासून १५ ते २० किमी अंतरावर होते. त्यानंतर या चित्रिकरणाची दोन वेगवेगळ्या एआय अल्गोरिदममधून तपासणी करण्यात आली. हे अल्गोरिदम कॉम्प्युटर व्हिजन तंत्रावर आधारित होते.

यातील पहिल्या अल्गोरिदमने सीसीटीव्ही फुटेजमधून लाल खुणा असलेल्या ट्रकांना वेगळे केले. त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या अल्गोरिदमने या ट्रकांचा सरासरी वेग तपासून कोणत्या ट्रकचा अपघातामध्ये हात असू शकतो याची माहिती घेण्यास मदत केली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका ट्रकची ओळख पटवली. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने ग्वाल्हेर कानपूर महामार्गावरून संबंधित ट्रक आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. हे ठिकाण अपघात स्थळापासून ७०० किमी अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या ३६ तासांमध्येच संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला.

पोलिसांनी सांगितले की, आधी माहितीचं विश्लेषण हे अनुभवी पोलीस अधिकारी करायचे. त्यात चुका होण्यास वाव होता. तसेच या सर्वाला अनेक आठवड्यांचा अवधी लागायचा. मात्र एआय आणि फास्ट प्रोसेसरच्या मदतीने हे काम झटपट होऊ शकतं. या प्रकरणामध्ये १२ तासांच्या सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी अवघ्या १२ ते १५ मिनिटांमध्ये करण्यात आली. एआय नसतं तर या कामाला एका दिवसापेक्षा अधिक अवधी लागला असता.  

Web Title: Truck driver ran away after hitting a bike, police caught him with the help of AI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.