थंडीपासून बचावासाठी खोलीत शेगडी पेटवून झोपले, गुदमरून तिघांचा मृत्यू; बेळगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:33 IST2025-11-19T15:33:07+5:302025-11-19T15:33:47+5:30
एक जण गंभीर जखमी

थंडीपासून बचावासाठी खोलीत शेगडी पेटवून झोपले, गुदमरून तिघांचा मृत्यू; बेळगावातील घटना
बेळगाव : थंडीपासून बचावासाठी खोलीत शेगडी पेटवून झोपलेल्या तीन मित्रांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये रिहान मते (वय २२), सरफराज हरपणहळ्ळी (२२) आणि मोईन नलबंध (२३) यांचा समावेश आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहानवाज (१९) याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बेळगाव शहरातील अमननगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. हे तिघे मित्र एकाच खोलीत राहात होते. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी या चारही मित्रांनी रात्री झोपण्यापूर्वी खोलीच्या आत कोळशाची शेगडी पेटवली. थंडीमुळे त्यांनी खोलीचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात जमा झाला. झोपेत असल्यामुळे त्यांना हे लक्षात आले नाही. नंतर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा श्वास गुदमरला.
या घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी तातडीने माळमारुती पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माध्यमांना सांगितले की, थंडीपासून बचावासाठी कोळशाची शेगडी पेटवून खोली बंद ठेवल्याने कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे या तीन तरुणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एका जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. नेमका प्रकार कशामुळे घडला, याबद्दल अधिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आमदार असिफ सेठ यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, चार तरुण एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. परतल्यानंतर थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी लहान शेगडीचा वापर केला. रात्री धुराचे प्रमाण वाढल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. माळमारुती पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.